उमरग्यात आठ दिवसांत आले दीड हजार नागरिक

file photo
file photo

उमरगा (उस्मानाबाद) : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य, परराज्य, जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या महिनाभरात साडेतीन हजाराहून अधिक झाल्याने कोरोनाविषयीची भीती वाढली आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत मुंबई, पुणे शहरांतून जवळपास दीड हजार लोक दाखल झाले आहेत. त्यांची उपजिल्हा रुग्णालयात नॉर्मल तपासणी केली जात असल्याने दडलेल्या कोरोना विषाणूची बाधा किती जणांना होणार, याविषयी कमालीची भीती वाढली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम उमरगा शहरासह तालुक्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर बाधित व्यक्तींचे अंतिम अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले; मात्र आता संसर्गाची खरी भीती वाढली आहे. परराज्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

प्रशासनाने सतर्कता बाळगत परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना थेट घराकडे न पाठवता आरोग्य तपासणी करीत होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जातोय; मात्र नॉर्मल तपासणी होत असल्याने होम क्वारंटाइन केलेले काहीजण दक्षता घेत नाहीत. बाधा झाल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

१४ एप्रिलपासून २० मेपर्यंत ग्रामीण भागात आलेल्या लोकांची संख्या दोन हजार ८३१ झाली आहे. त्यातील ९८१ लोकांची सोय शाळेत करण्यात आली आहे. ९८४ जण शेतात, तर ९९४ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. यापैकी ३०१ जणांना चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

उमरगा शहरात दाखल झालेली संख्या ६१४ झाली आहे. त्यात होम क्वारंटाइनमध्ये ५८८, शेतात एक तर इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये २५ जण होते. त्यातील २३ जणांसह होम क्वारंटाइनमधील २७ जणांना चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले. मुरूम शहरात झालेल्या लोकांची संख्या दीडशेपेक्षा अधिक आहे. 

क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या लोकांची होतेय गैरसोय 
रेड झोनमधील नागरिक शहरासह तालुक्यात परतत आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. होम क्वारंटाइन लोकांची आरोग्याविषयी नियमित विचारपूस करणे आवश्यक आहे. शाळेत असलेल्या लोकांसाठी स्वच्छतागृहाची परिपूर्ण व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी विजेची सोय नाही. जेवणाची सोय प्रशासनाकडून केली जात नाही. त्यात बऱ्याच लोकांना घरचा डबा मिळत नाही. तर शेतात राहणाऱ्या लोकांची वादळी वारा, पावसाने गैरसोय होत आहे. दाटीवाटीच्या उमरगा शहरात ५८८ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले. काही लोक बाजारपेठेत फिरत असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com