सायकलीने जाण्यासाठी परवानगी द्या, बिहारच्या नऊ जणांची विनवणी

File photo
File photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी शासन निर्देशानुसार महसूल प्रशासनाकडे उमरगा व लोहारा तालुक्यांतील नागरिकांची यादी प्राप्त झाली आहे. गुरुवारी (ता. सात) प्राप्त झालेल्या माहितीनुसार ४४२ जणांना परत पाठविण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

उमरगा, लोहारा तालुक्यांत उदरनिर्वाहासाठी विविध ठिकाणी कामावर आलेले परराज्यातील नागरिक लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून येथे अडकले आहेत. या कालावधीत हाताला कोणतीही कामे नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेलंगणा व आंध्रप्रदेशातील जवळपास २५ विद्यार्थी अडकले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी किती दिवस राहू शकेल, याचा अंदाज नाही. त्यामुळे शासनाने परराज्यातील नागरिकांना परत पाठविण्याचे नियोजन सुरू केले आहे. 

उमरगा तालुक्यातून ३६० लोकांची यादी तयार आहे. त्यात तेलंगणातील सहा, आंध्र प्रदेशातील १९, बिहार ४०, गुजरात पाच, झारखंड एक, हरियाना सात, कर्नाटक ३०, मध्यप्रदेश ६६, उतरप्रदेश १२०, पश्चिम बंगाल सात, राजस्थान येथील ५५ जणांचा समावेश आहे. तर लोहारा तालुक्यातून तेलंगणातील आठ, बिहार पाच, झारखंड १५ कर्नाटक तीन, मध्यप्रदेश २०, उत्तरप्रदेश १४, राजस्थान आठ तर पंजाब राज्यातील पाच अशा ८० जणांचा समावेश आहे.

दोन्ही तालुक्यांतून ४४२ नागरिकांची यादी महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. दरम्यान, लोहारा तालुक्यातील हराळीत असलेल्या तेलगंणातील मजूर कुटुंबातील ८८ जणांना तीन दिवसांपूर्वी पाठविण्यात आले.

विशेष रेल्वेसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि तीही गावापर्यंत सोय होणार नसल्याने राजस्थानातील ४२ जण प्रशासनाची परवानगी घेऊन बुधवारी (ता. सहा) खासगी जीपने स्व:खर्चातून परतले. मध्यप्रदेशातील लोकांसाठी औरंगाबाद येथून विशेष रेल्वेची सोय असल्याने त्या लोकांना प्रशासनाकडून औरंगाबादपर्यंत पोचवण्यात येणार आहे. 

तर सायकलीने जाण्याचा परवाना द्या 
बिहार राज्यात जाण्याची सोय होणार असली तरी त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी वाहनधारक परराज्यात जाण्यासाठी तयार नाहीत. उदरनिर्वाहासाठी आलेल्या नऊ जणांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

गावाकडे जाण्याची ओढ लागलेले हे नऊ जण गुरुवारी तहसील कार्यालयाकडे आले होते. त्यांनी पंधराशे किलोमीटर अंतरापर्यंत सायकलने जाण्याची परवानगी द्या, अशी विनवणी केली. वाहनाची सोय केव्हा होईल सांगता येत नसल्याने आम्ही सायकलने गावाकडे जाऊ शकतो, असे बबलू गुप्ता यांनी सांगितले. 
 

परप्रांतीयांना परत पाठविण्यासंदर्भात प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगाने यादी तयार केली आहे. आपापल्या राज्यातील गावाकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाकडे माहिती द्यावी. ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जात आहे. विशेष रेल्वेने त्यांना पाठविले जाणार आहे. या संदर्भात संबंधिताना कळविण्यात येणार आहे. 
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com