
आठ दिवसांचा कालावधी संपताच परत मंगळवारी (ता. पाच) रात्री साडेअकरा वाजता पांगरा शिंदे येथे जमिनीतून गूढ आवाज आला. हा आवाज वापटी, कुपटी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा आदी गावांत आला आहे.
हिंगोली : वसमत व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत मंगळवारी (ता. पाच) मध्यरात्री जमिनीतून गूढ आवाज आला. जमीन हादरून टीनपत्रांचा खडखडाट झाल्याने गावकरी रस्त्यावर आले. यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. या गावात आवाज आल्यानंतर परिसरातील अनेक गावांत आवाज जाणवतो. हा आवाज नेकमा कशामुळे होत आहे, याचे गूढ अद्याप उलगडले नाही. तरीही काही ग्रामस्थ भूकंपामुळे आवाज येत असल्याचे सांगत आहेत.
हेही वाचा - हिंगोली @ ९१ : दोन दिवसांत ३८ कोरोनाबाधित
सलग तीन दिवस आवाज
मागील महिन्यात (ता. २७) एप्रिल रोजी पांगरा शिंदे येथे आवाज आल्यानंतर लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर ३.४ नोंद झाली होती. हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर (ता. २७) एप्रिलपासून सलग तीन दिवस आवाज आले होते.
मंगळवारीही रात्री आले आवाज
त्यानंतर आठ दिवसांचा कालावधी संपताच परत मंगळवारी (ता. पाच) रात्री साडेअकरा वाजता पांगरा शिंदे येथे जमिनीतून गूढ आवाज आला. हा आवाज वापटी, कुपटी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा आदी गावांत आला आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, बोल्डा, येहळेगाव गवळी, असोला या गावांतदेखील आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत.
कोणतीही नोंद नाही
आवाज आल्यानंतर जमीन हादरल्याने घरावरील टीनपत्रांचा खडखड असा आवाज आला. यामुळे घरात झोपलेले गावकरी खडबडून जागे होत रस्त्यावर आले. या बाबत मात्र कोणतीही नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आले.
अनेकवेळा आले आवाज
पांगरा शिंदे येथे अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. पूर्वी वर्ष ते सहा महिन्याला आवाज येत असत. त्यानंतर तीन ते चार वर्षे कधी आठ दिवसाला ; तर कधी पंधरा दिवसाला आवाज येत होते. आताही पंधरा दिवस उलटले नाही, तोच पुन्हा आजावा आले.
येथे क्लिक करा - भालीपाला विक्रेत्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक
तज्ज्ञांनी केली होती पाहणी
पांगरा शिंदे येथील गूढ आवाजाबाबत नांदेड येथील स्वारातीम विद्यापीठातील तज्ज्ञांनी दोन वर्षांपूर्वी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, आवाजाचे गूढ उकलले नाही. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थान कक्षालाही ग्रामस्थांनी कळविले आहे.
मार्गदर्शन करण्याची मागणी
पांगरायेथे होत असलेल्या आवाजाची किंवा भूकंपाच्या हादऱ्याची कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक दिवसांपासून होत असलेल्या गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आवाजाचे गूढ उकलून ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.