गर्दी टाळा, कोरोनापासून दूर राहा...

मुरुम (ता. उमरगा) : येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.
मुरुम (ता. उमरगा) : येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : पैसे काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (ता. पाच) मुरुम (ता. उमरगा) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फ़ज्जा उडाला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी काटेकोरपणे पालन करीत आपली दुकाने न उघडता गर्दी टाळल्याचे दिसून आले.

उस्मानाबाद ग्रीन झोनमध्ये असल्याने केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार सर्व दुकाने उघडतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस नियम व अटींचे पालन करुन सर्व आस्थापने सुरु राहतील, असे आदेश सोमवारी काढले.

तब्बल दीड महिन्यानंतर लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाले, मात्र सोमवारी एकच दिवस सूट मिळाली. मंगळवारी सर्व दुकाने बंद ठेवत लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मुरुमच्या बाजारपेठेशी परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा व्यवहार निगडीत आहे. जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने, रुग्णालय, बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शाळा महाविद्यालय, एटीएम या सेवा मुरुममध्येच आहेत.

परिसरातील केसरजवळगा, बेळंब, आलूर, कोथळी, कंटेकुर, भुसणी, तुगाव, नाईकनगर, सुंदरवाडी, वरनाळ, आष्टाकासार, मुरळी आदी गावांतील बहुतांश नागरिकांचा दैनंदिन व्यवहार मुरुमशी निगडीत आहे. त्यामुळे पैसे काढणे, तसेच भरणा करण्यासाठी मुरुमच्या महाराष्ट्र बँकेसह भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नेहमी गर्दी असते. शहरातील एटीएम सेवा नावालाच सुरु आहेत. कधी चलन तुटवडा, तर कधी नेटवर्कअभावी ग्राहक पैसे काढण्यासाठी बँकेसमोर रांगा लावून गर्दी करतात.

सध्या कोरोनाचे संकट घोंगावत आहे. मात्र अपुरे कर्मचारी, चलन तुटवड्यामुळे गर्दी वाढत आहे. शहरात स्टेट बँकेचे दोन, तर खासगी बँकांचे दोन एटीएम सेवा केंद्र आहेत. मंगळवारी एसबीआय बँकेचे एटीएम रक्कम नसल्याने बंद होते. त्यामुळे महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये कॅश होती. एसबीआयचे एटीएम शाखेच्या वेळेतच सुरु असते. इतरवेळी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बंद असते. महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोवीस तास सुरु असले तरी कधी कॅशचा तुटवडा, तर कधी नेटवर्कअभावी एटीएम सेवा बंद असते. खासगी बँकाच्या एटीएमची अवस्था ही अशीच आहे.

दोन्ही बँकेच्या शाखेची ग्राहक संख्या सुमारे ६० हजार आहे. बहुतांश ग्राहक रांगा लावूनच पैसे काढतात. सध्या कोरोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com