आधी रक्तदान, नंतर चढला बोहल्यावर

सयाजी शेळके
रविवार, 17 मे 2020

बोहल्यावर चढण्यापूर्वी शेळका धानोरा येथे नवरदेवाने गावात आयोजित शिबिरात नववधुसह हजेरी लावून रक्तदान करीत एक वेगळा संदेश दिला आहे. जगदंबा ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने हे शिबिर घेण्यात आले. 

उस्मानाबाद : बोहल्यावर चढण्यापूर्वी एका युवकाने आधी रक्तदान करीत एक वेगळा संदेश दिला आहे. कळंब तालुक्यात अनोख्या पद्धतीने हा शुभविवाह पार पडला आहे.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी टाळेबंदीमुळे सध्या सर्वत्र सन्नाटा आहे. उद्योग-व्यवसाय, रेल्वे, बस वाहतूक बंद आहेत. याशिवाय लग्नसोहळेही पुढे ढकलले जात आहेत. मात्र कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे नवरदेवाने अक्षदा पडण्यापूर्वी रक्तदान करून एक वेगळा संदेश दिला आहे.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

जगदंबा ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने गुरुवारी ( ता. १४) गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचदिवशी रमाकांत शेळके या युवकाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. मात्र अक्षदा पडण्यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपत वधू-वराने रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यामध्ये नवरदेवाने रक्तदान करून कोरोना विरोधातील एकोप्याने लढण्याचा संदेश दिला. 

हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज 

५१ दात्यांचे रक्तदान 
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ५१ दात्यांनी रक्तदान करीत अनोख्या पद्धतीने जयंती साजरी केली. या वेळी गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'आधी रक्तदान आणि नंतर शुभमंगल' असा या अनोख्या शुभविवाहाची परिसरात चांगलीच चर्चा झाली. ग्रुपच्या वतीने गावात रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम राबविले जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Blood donation first, then marriage