उस्मानाबादेत अत्यावश्यक सेवा वगळता ३१ मेपर्यंत बंद

सयाजी शेळके
बुधवार, 20 मे 2020

रुग्णासह त्याचे कुटुंब मुंबईहून सोलापूरला एका खासगी वाहनाने आले असल्याची माहिती आहे. तर सोलापूर ते तामलवाडीपर्यंतचा प्रवास त्यांनी पायी केला. त्यानंतर उस्मानाबाद शहरातून तामलवाडीपर्यंत दुचाकीने गेलेले नातेवाईक त्यांना शहरात घेऊन आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सात ते आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

उस्मानाबाद : शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर ३१ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता उस्मानाबाद शहरातील अन्य दुकाने बंद असणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी ही माहिती दिली. 

बुधवारी (ता. २०) सकाळी उस्मानाबाद शहरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. सदर रुग्णाला कर्करोग असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. रुग्णासह त्याचे कुटुंब मुंबईहून सोलापूरला एका खासगी वाहनाने आले असल्याची माहिती आहे. तर सोलापूर ते तामलवाडीपर्यंतचा प्रवास त्यांनी पायी केला.

 हेही वाचा - औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

त्यानंतर उस्मानाबाद शहरातून तामलवाडीपर्यंत दुचाकीने गेलेले नातेवाईक त्यांना शहरात घेऊन आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील सात ते आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अन्य काही जण ही रुग्णांसह नातेवाईकांच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. शिवाय लक्षणे आढळणाऱ्यांचे स्वब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. तसेच त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. यासाठी संपूर्ण शहर ३१ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज सकाळी दहा वाजता बाजारपेठ सुरू होताच अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील अन्य दुकाने तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात सध्या मेडिकल दुकान वगळता बँक ऑफ वगळता सर्व स्थापना बंद करण्यात आले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी मनोहरे यांनी ही माहिती दिली आहे. अचानक सकाळी एक रुग्ण आढळून आल्यानंतर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांची धावपळ उडाली. शहराच्या परिसरातील अनेक नागरिक शहरात आले होते. अचानक शहर बंदचा निर्णय झाल्याने त्यांचीही धांदल उडाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad city closed till 31 May