कर्नाटकातील तरुणाच्या गुढमय मृत्यूप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल

अविनाश काळे
Thursday, 11 February 2021

दुचाकीच्या अपघातानंतर उपचारासाठी दाखल होता तरूण; आईच्या फिर्यादीनुसार दाखल झाला गुन्हा

उमरगा (उस्मानाबाद): उमरगा तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या कर्नाटकातील खजुरी गावाच्या एका तरूणाच्या खून प्रकरणी खजुरीतीलच त्याच्या दोन मित्राविरुद्ध मंगळवारी (ता.नऊ) रात्री उशीरा खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान लातूर - कलबुर्गी मार्गावर इंद्रधनू वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास शनिवारी (ता.सहा) रात्री दुचाकीच्या अपघातात जखमी असलेल्या तरूणाला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रविवारी (ता. सात) सकाळी त्याचा मृत्यु झाला.

हा मृत्यू संशयास्पद असल्याने खूनाचा गुन्हा दाखल झाला असून गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसासमोर आव्हान आहे. या बाबतची प्राप्त माहिती अशी की, आळंद तालुक्यातील खजूरी येथील संतोष इराण्णा सावळसुरे वय ३२ वर्ष हा शनिवारी स्वतःच्या दुचाकीवरून गावातील मित्र भिमाशंकर करबसप्पा तळवार, संजयकुमार शिवपूत्र हुगार यांना घेऊन उमरगा - चौरस्त्याजवळील बिरूदेव मंदिर परिसरातील जनावरांच्या बाजारात आले होते.

सार्वत्रिक निवडणुकानंतर आता ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा बिगुल

रात्री साडेआठच्या सुमारास तिघेही परत खजूरीकडे जात असताना वृद्धाश्रमाजवळ रस्त्यावर संतोष सावळसुरे जखमी अवस्थेत पडल्याने कांही जणांनी रुग्णवाहिका बोलावून संतोषला उमरग्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. 

मृत्यूच्या तपासाचे पोलिसासमोर आव्हान
तिघे मित्र एकाच दुचाकीवरून जात असताना अपघातात संतोषच्या हाता, पायावर जखमा होत्या. मात्र भिमाशंकर व संजयकुमार या दोघांना कसलीही दुखापत नव्हती. दुचाकीचेही नुकसान झाले नव्हते मग संतोष नेमका जखमी कसा झाला. हा प्रश्न आहे, शिवाय संतोषला उपचारासाठी नेताना दोघे मित्र सोबत होते मात्र रात्री बारा वाजता दोघेही रुग्णालयातुन फरार झाले. त्यामुळे या प्रकरणात घातपाताचा संशय  बळावला. या प्रकरणी संतोषची आई विजयाबाई सावळसुरे यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री उशीरा खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे तपास करीत आहेत.

कोट्यावधीच्या जीएसटीला चुना लावण्याचा डाव उघड; लातुरातील कंत्राटदारांकडून `...

पोलिस अधिक्षकांनी घेतला आढावा
उमरगा -चौरस्ता ते कर्नाटकातील खजुरी सिमेपर्यंत यापूर्वी घातपाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ३२ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी उस्मानाबादचे पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी बुधवारी (ता.१०) घटनास्थळी भेट देऊन उमरगा पोलिस ठाण्यात माहिती घेतली. पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकाच्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली, स्वतंत्र पथकामार्फत तपास सुरू आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad crime news Two charged murder of Karnataka person