कोरोनापासून संरक्षणासाठी युवकाने तयार केले उपकरण

सयाजी शेळके
सोमवार, 18 मे 2020

कोरोनाबाधिताच्या हातावरील विषाणू बॉटलला चिकटू शकतो. त्यामुळे दुसऱ्या सामान्य व्यक्तीस सॅनिटायझरच्या बॉटलला स्पर्श केल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कल्याण पाटील यांनी तयार केलेल्या उपकरणामुळे हा धोका आपण टाळू शकतो.

उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळी साधने, उपकरणे, औषधी बाजारात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कल्याण पाटील या युवकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक अनोखे उपकरण तयार केले आहे. स्वयंचलित पॅंडल मशीन असे या यंत्राचे नाव असून, स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करणे या उपकरणामुळे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाने देशासह संपूर्ण जग हादरले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत. तसेच अनेकजण कोरोनावर मात कशी करता येईल? संपूर्ण जगाला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझरचा उपयोग केला जात आहे. मात्र दुर्दैवाने एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीने वापर केलेल्या सॅनिटायझरच्या बॉटलला दुसऱ्याचा हात लागल्यास कोरोनाची बाधा होते. कोरोनाबाधिताच्या हातावरील विषाणू बॉटलला चिकटू शकतो. त्यामुळे दुसऱ्या सामान्य व्यक्तीस सॅनिटायझरच्या बॉटलला स्पर्श केल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कल्याण यांनी तयार केलेल्या उपकरणामुळे हा धोका आपण टाळू शकतो. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कसे आहे उपकरण 
दोन लोखंडी पट्ट्या जोडून तयार केलेल्या चौफुलीवर सुमारे तीन फूट उंचीचा रॉड घट्ट बसविण्यात आला आहे. रॉडच्या वरील बाजूस सॅनिटायझर बॉटल ठेवण्यासाठी विशिष्ट रचना तयार केली. तीन फूट उंचीच्या रॉडला लहान आकाराचा दुसरा रॉड जोडण्यात आला आहे. त्याला स्प्रिंग जोडल्याने खालच्या बाजूला लावलेल्या पॅंडलवर पायाने प्रेस केल्यानंतर बॉटलवरील नॉब दाबला जातो.

त्यामुळे बॉटलमधून सॅनिटायझर बाहेर येते. त्यामुळे स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करता येतो. हे उपकरण तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नसला तरी कल्याण यांच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे. 

कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी हे उपकरण उपयोगी आहे. हे उपकरण अगदी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. कोरोना संसर्ग रोखण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. 
- कल्याण पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Device designed by youth for protection from corona