उस्मानाबाद जिल्ह्याचा मृत्यूदर तीन टक्क्यांच्या पुढे, आज २११ जणांना कोरोनाची लागण

सयाजी शेळके
Sunday, 27 September 2020

उस्मानाबाद  जिल्ह्याचा कोरोना संसर्गाने होणारा मृत्यूदर तीनच्या पुढे सरकला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्याचा कोरोना संसर्गाने होणारा मृत्यूदर तीनच्या पुढे सरकला आहे. रविवारी (ता.२७) जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू, तर नवीन २११ रुग्णांची भर पडली आहे. वाढता मृत्यूदर ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. दरम्यान उपचार घेऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही रविवारी तब्बल २६३ होती. जिल्ह्यात रविवारी २११ स्वॅब नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले.

यामध्ये १०२ पॉझिटीव्ह आढळून आले, तर ९१ निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे १८ इनकन्क्लुझिव अहवाल आहेत. दरम्यान ४९५ जलद अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १०९ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. ३८६ निगेटिव्ह आले असून रविवारी जिल्ह्यात एकूण २११ नव्याने पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्याचा मृत्यूदर तीन पेक्षाही पुढे गेला आहे. म्हणजे रविवारी आतापर्यंतचा सर्वाधिक ३.०१ मृत्यूदर आढळून आला आहे. त्यामुळे ही बाब जिल्ह्यासाठी चिंतेची ठरत आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करणे हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आवाहन असणार आहे.

रोगराईच्या विळख्यात अडकली पपईची बाग; पाऊस, बदलत्या वातावरणाचा फटका

तालुकानिहाय रुग्णसंख्या
जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात सर्वात जास्त ५८ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय कळंबमध्ये ३८, तुळजापूर २२, उमरगा १४, लोहारा १६, वाशी २४, भूम १४ तर परंड्यात २५ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात रविवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तिघे जण कळंब शहरातील आहेत, तर उर्वरीत उमरगा, उस्मानाबाद, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३५१ मृत्यूंची नोंद झाली आहे, असे असले तरी रविवारी तब्बल २६३ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad District's Corona Death Rate Above Three Percent