उस्मानाबाद : छाप्यांपूर्वी माहिती कशी मिळते; सुप्रिया सुळे | Supriya Sule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule on Osmanabad ED CBI raids

उस्मानाबाद : छाप्यांपूर्वी माहिती कशी मिळते; सुप्रिया सुळे

उस्मानाबाद : ईडी, सीबीआय या संस्था स्वायत्त असल्याचे केंद्र सरकार सांगत असले तरी छापे पडण्याआधी भाजपच्या लोकांना त्याची माहिती कशी मिळते, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारणा करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आठवा वर्धापन दिन साजरा करीत असताना देशातील जनतेला या सरकारने महागाईचे गिफ्ट दिल्याचा चिमटा त्यांनी भाजपला काढला. (Supriya Sule News)

राज्यात सध्या आरोप करण्याची एक फॅशन बनली आहे. माध्यमांसमोर येऊन कुणीही काहीही आरोप करतो. आरोपांमागची विश्वासार्हता तपासली जात नाही. त्यातून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. ईडी, सीबीआय या केंद्रीय संस्था केंद्र सरकराच्या दबावाखाली काम करत असल्यानेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर छापे पडत असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. कोण काय बोलतो यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. याच कामात व्यस्त असते. त्यामुळे अशा बाबींकडे लक्ष जात नाही, असे सांगताना सुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाकडे आपल्या विधानासंदर्भात दिलगिरी व्यक्त केल्याचे कळताच, मनाचा मोठेपणा दाखवून चंद्रकांतदादांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय आता संपवावा, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली.

तेरला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा

विविध बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण असलेले तेर (ता. उस्मानाबाद) हे गाव आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा एक भाग बनू शकते. यादृष्टीने या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

नातेसंबंध व राजकारण वेगळे

डॉ.पद्मसिंह पाटील व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ऋणानुबंध अत्यंत जवळचे होते, ते आजही टिकून आहेत. राजकारण व नातेसंबंध या वेगळ्या गोष्टी असल्याचे सुळे म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबादच्या उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्याचा विषय पक्षीय पातळीवरील नाही. हा विषय शिक्षण विभागाशी निगडित आहे. या विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही होईल.

- सुप्रिया सुळे, खासदार

Web Title: Osmanabad Ed Cbi Raids Supriya Sule Union Home Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top