अजिंक्य राहणेकडून केळी दान करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतूक

सयाजी शेळके
Sunday, 5 April 2020

आपल्या दोन एकरातील केळी दान करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे कौतूक करीत आपला देश कोरोणाशी कसा संघटीतपणे लढा देत आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे ट्विट अजिंक्य राहणे याने केले आहे.

उस्मानाबाद : एका मराठमोळ्या क्रिकेटपटूनेही गरजूंसाठी आपल्या दोन एकरातील केळी दान करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतूक करीत आपला देश संघटीतपणे कोरोणाशी लढा देत असल्याचे ट्विट भारताचा आघाडीचा फलंदाच अजिंक्य राहणे याने केले आहे. तुळजापूर तालुक्यातील शेतकरी विकास पटाडे यांच्या दोन एकरातील केळी दान केलेल्याचे प्रकाराचे कौतुक केले आहे.

कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक सामाजिक संघटना, उद्योजक, सिनेकलाकार आपल्या परिने या लढ्यात स्वतःचे योगदान देत आहेत. कोणी आर्थिक तर कोणी वस्तुंच्या स्वरुपात मदत करून लढ्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुळजापूर तालुक्यातील विकास रामलिंग पटाडे यांनी त्यांच्या दोन एकर बागेतील केळी लॅकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी स्वत: श्री. पटाडे यांच्या शेतात जावून त्यांच्या उपक्रमाचे कौतूक करीत टेम्पो भरून केळी घेऊन गेले आहेत. दरम्यान, केळी देताना विकास यांनी, `माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही, मात्र माझ्याकडे असलेल्या दोन एकरातील केळी गरजू भुकेलेल्यांना देवू शकतो, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रोजगाराशिवाय दैनंदिन गरज भागवू शकत नाही, अशा गरीब कुटुंबियांना केळी देण्याचे आवाहन विकास पटाडे यांनी केले होते.

`सकाळ`ने याची दखल घेत, त्यांच्या दानशूरपणाचे कौतुक करून वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य राहणे याने शेतकरी विकास पटाडे यांच्या दानशूरपणाचे कौतुक केले आहे. अजिंक्य एक मराठमोठा क्रिकेटपटू असून नेहमीच अशा दानशूरपणामध्ये तो पुढाकार घेतो. तो म्हणतो, की तुमची ओळख तुम्ही कोण आहोत, यावरून होत नाही. तर तुम्ही काय दान केले आहे, यावरून तुमची ओळख तयार होत असते, असे म्हणत पटाडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपला देश कोरोणाशी कसा संघटीतपणे लढा देत आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्याने म्हटले आहे. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याने दाखविलेला दानशूरपणा आगळावेगळा आहे. प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने मदत करीत आहे. तशीच मदत प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे. असे सांगत त्याने कामठा (ता. तुळजारपूर) येथील शेतकऱ्याने दोन एकरातील केळी दान केलेल्या प्रकाराचे कौतुक केले आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील शेतकरी विकास पटाडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Farmer's appreciation by Ajinkya Rahane