esakal | पहिल्या दिवशी चार हजार २९३ बल्क लिटर मद्य विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा : मद्य खरेदीसाठी रांगेत थांबलेले ग्राहक.

उमरगा, लोहारा तालुक्यांसह जळकोट भागातील ५१ मद्यविक्रीचे दुकाने शौकिन ग्राहकाच्या सेवेत सुरु झाली. दरम्यान, एका दिवसात चार हजार २९३ बल्क लिटर मद्य विक्री झाली असून, बुधवारपासून त्यात आणखी वाढ होऊ शकते.

पहिल्या दिवशी चार हजार २९३ बल्क लिटर मद्य विक्री

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाउन सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आहे. या काळात मद्यविक्री बंद असल्याने शौकिनांची चांगलीच पंचाईत झाली होती. कधी नवसागर, कर्नाटकी मद्य तर कधी छुप्या मार्गाने वाढीव दराने मिळणारे मद्य खरेदी करून तलफ भागविण्याचा प्रयत्न झाला. मात्र मंगळवारी (ता. १९) जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीला परवानगी दिल्याने उमरगा, लोहारा तालुक्यांसह जळकोट भागातील ५१ मद्यविक्रीचे दुकाने शौकिन ग्राहकाच्या सेवेत सुरु झाली. दरम्यान, एका दिवसात चार हजार २९३ बल्क लिटर मद्य विक्री झाली असून, बुधवारपासून त्यात आणखी वाढ होऊ शकते.

मद्यविक्रीबाबत अन्य जिल्ह्यातील अनुभव लक्षात घेऊन जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्यानंतरही मद्यविक्रीला परवानगी दिली नव्हती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीला परवानगी दिली. मद्यप्रेमींनी नियमाचे पालन करीत मंगळवारी सकाळी आठ वाजता मद्यविक्री सुरू झाली. शारीरिक अंतर राखून ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरचा वापर करून मद्य विक्री केली जात असल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

वाईन शॉपीच्या दुकानासमोर बॅरेकेडिंग लावले होते. ग्राहक रांगेत थांबून दुपारी दोनपर्यंत मद्य खरेदी करीत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक के. टी. धावरे, सीमा तपासणी विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. सिंग, श्री. चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, कर्मचारी यांच्यासह संबंधित दुकानदाराने व्यवस्था चोख ठेवल्याने गर्दी नियंत्रणात दिसून आली. 
हाफकिनच्या सहकार्याने लसीचे संशोधन, मंत्री अमित देशमुख
चार हजार २९३ बल्क लिटर मद्यविक्री 
मंगळवारी पहिल्या दिवशी देशी मद्याची एक हजार ६५० बल्क लिटर सर्वाधिक विक्री झाली. विदेशी ७२५, स्ट्राँग बियर एक हजार ८१८, माईल्ड बियर ७५ तर वाईन २५ बल्क लिटर विक्री झाली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, नियमांचे पालन करून उमरगा व लोहारा तालुक्यांतील एकमेव वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने व बियर शॉपी येथे शांततेत मद्यविक्री सुरू करण्यात आली. परवानाधारकांना मद्यविक्री केली जात होती. काही दुकानदाराकडे शिल्लक असलेला एक दिवसाचा परवाना ग्राहकांना देण्यात आला. ऑनलाइन परवाना आजपासून सुरू राहणार आहे. मद्यविक्री शांततेत होण्यासाठी पोलिस यंत्रणेचे तसेच ग्राहकांचे सहकार्य मिळत आहे. 
- के. टी. धावरे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

loading image