स्वस्त धान्य दुकानदारांकडून घेतली जातेय खबरदारी

चंद्रकांत गुड्ड
गुरुवार, 26 मार्च 2020

ग्राहकांना धान्य देण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर धान्य वाटप करण्यात येत आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून लाभार्थ्यांचा मशीनवर अंगठा घेतला जात नाही.

अणदूर (जि. उस्मानाबाद) : कोरोना संकटातून बचावासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांच्या सुरक्षिततेसाठी येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी दुकानासमोर खडूने खुणा केलेल्या चौकटीत उभे राहून ग्राहकांना धान्य वितरण करण्यात येत आहे. तसेच ठराविक लाभार्थींसोबत फोनवरून संपर्क साधून एका-एकास बोलावून धान्यवाटप केले जात आहे.

येथील वत्सलानगरातील सरस्वती महिला बचतगट संचालित रास्त भाव धान्य दुकान आहे. दुकानात एकावेळी मोठी गर्दी होऊन कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. एकावेळी केवळ सात शिधापत्रिकाधारकांना फोनवर संपर्क साधून बोलावून घेतले जात आहे. चार ते पाच फूट अंतरावर खडून चौकोनी खुणा करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ग्राहकांना त्या चौकोनात उभे केल्यानंतर धान्य देण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर धान्य वाटप करण्यात येत आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून लाभार्थ्यांचा मशीनवर अंगठा घेतला जात नाही. दरम्यान, कोरोनामुळे संचारबंदी असतानाही ऐन सणासुदीच्या दिवसांत धान्य मिळत असल्याने शिधापत्रिकाधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप जाधव यांच्या आदेशानुसार धान्य वितरण करण्यात येत असल्याचे बाबई ऊर्फ सुजाता चव्हाण यांनी सांगितले. 
सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. तर दुसरीकडे मोठ्या कष्टाने पिकविलेले गहू, ज्वारी, हरभरा, करडई, जवस, द्राक्षे आदी पिकांच्या काढणीसाठी शेतकरी मजुरांअभावी तडफडू लागला आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जमावबंदीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबरोबर शेतमजूरही रोजगारापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत असल्याचे मोठा दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Grain distribution from shopkeepers