अवकाळी पावसामुळे पडला द्राक्षांचा सडा

सुधीर कोरे
बुधवार, 25 मार्च 2020

नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांवरील संकटाचे दुष्टचक्र संपता संपत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले.

जेवळी  (उस्मानाबाद) : जेवळीसह (ता. लोहारा) परिसरात मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने फळबाग व हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तासभर झालेल्या या पावसामुळे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने परिसरात वीजपुरवठा खंडित झाला असून, बुधवारी (ता. २५) दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. 

शेतकऱ्यांवरील संकटाचे दुष्टचक्र संपता संपत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. जेवळी परिसरात मंगळवारी सायंकाळी सात ते आठ या काळात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. सध्या शिवारात हरभरा, ज्वारी, गहू, करडई आदी रब्बी पिके काढणीला आली आहेत. शिवारात अनेक ठिकाणी काढणीची लगबग सुरू आहे; परंतु या जोरदार पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

उभी पिके जमीनदोस्त झाली असून, काढणी केलेली पिके रानात विखुरल्याने भिजून मातीत मिसळले आहेत. यंदा आंब्याला मोहोर अल्प प्रमाणात आला होता. तोही या पावसात झडून गेला. पावसामुळे परिसरातील फळबागांचे नुकसान झाले असून, द्राक्षांच्या मण्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

अनेक ठिकाणी द्राक्षांचे घड तुटून जमिनीवर सडा पडला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. या जोरदार अवकाळी पावसामुळे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले, तर शिवारात ठिकठिकाणी झाडे व विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. बुधवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Grapes Fall Due To Rains