पालकमंत्री गडाखांनी शेतकऱ्यांसमवेत बांधावरच घेतली बैठक, अधिकाऱ्यांना घेतले बोलवून

तानाजी जाधवर
Saturday, 17 October 2020

पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक शेतकऱ्यांच्या समवेत त्यांच्या बांधावर घेतल्याने याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

उस्मानाबाद : पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक शेतकऱ्यांच्या समवेत त्यांच्या बांधावर घेतल्याने याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गडाख दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली तेव्हा महसूलचे प्रशासन सोबत होते. जे महत्त्वाचे अधिकारी नव्हते त्यांना निरोप देऊन बोलावुन घेत तिथेच बैठक घेण्याचा निर्णय घेतला. परतीच्या पावसाने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

उद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी   

नुकसानीचे प्रमाण सुध्दा सांगता येणार नाही इतक होते. दुसऱ्याच दिवसापासून खासदार, आमदार बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देत आहेत. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी देखील तातडीने दौऱ्याचे नियोजन केले. त्यानुसार ते शनिवारी (ता.१७ ) दुपारी जिल्ह्यामध्ये पाहणी करण्यासाठी पोचले. त्यांचा हा दौरा सुरू असताना तातडीने जिल्हाधिकारी, महसूल , कृषी असे संबधीत अधिकाऱ्यांना राजेगाव (ता.लोहारा) येथे बोलावून घेतले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तिथल्या तिथेच उत्तर मिळत होती. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री व जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक पार पडणे हे अभावानेच झाल्याचे दिसून आले आहे. या अगोदर दौरे, पाहणी होतच होते. पण थेट बांधावरच बैठक घेऊन तिथेच उपाययोजना सुचविण्याचा पालकमंत्र्यांचा हा फंडा शेतकऱ्यामध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.

कोरोनाने थांबवला ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष! तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक दिसेनात

पालकमंत्री गडाख यांनी तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असुन अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शनिवारी पालकमंत्री गडाख यांनी तीन तालुक्यांचा दौरा केला यामध्ये उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यातील गावांचा समावेश होता. शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न पालकमंत्री यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे सरकारच शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या अडचणीच्या काळात हे सरकार गंभीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा शब्द त्यानी यावेळी दिला. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत झालीच पाहिजे. यासाठी प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे असे आदेश श्री.गडाख यांनी प्रशासनाला दिले. त्यांनी राजेगाव येथे घेतलेल्या बैठकीत हे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर यांना दिले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Guardian Minister Shankarrao Gadakh Take Meeting With Farmers