छुप्या मार्गाने गुटखा विक्रीतून वरकमाई

अविनाश काळे
Thursday, 7 May 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम पानटपऱ्या बंदचे आदेश दिले. या आदेशाची संपूर्ण जिल्ह्यातील पानटपरीचालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली; मात्र छुप्या मार्गाने तंबाखू मावा, गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाउनच्या कालावधीतही बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री तिप्पट दराने करीत साठेबाज व्यापाऱ्यांनी चांगलीच वरकमाई केल्याची चर्चा आहे. दरम्यान, तालुक्याच्या सीमेलगत कर्नाटक राज्यातून छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. छुप्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न व भेसळ प्रशासन आणि पोलिस यंत्रणा काय करतेय, असा सवाल उपस्थित केला जातोय.

लॉकडाउनच्या काळात सर्वांत जास्त लूट मद्य व तंबाखू शौकिनांची झाल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी पाच रुपयांत मिळणाऱ्या तंबाखूच्या पुडीसाठी २५ रुपये मोजावे लागत असल्याचे वृत्त आहे. तर दहा रुपयांच्या पुडीसाठी पंचवीस ते तीस रुपये मोजावे लागत आहेत.

लॉकडाउनमध्ये चारपट रक्कम मोजून आपली हौस भागविण्याची वेळ शौकिनांवर आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार वगळता तंबाखूजन्य व मद्यविक्रीला शासनाच्या वतीने मज्जाव करण्यात आला आहे.

हेही वाचा व पहा : व्हिडिओ : प्रथमच भाविकांविना नृसिंह जन्मोत्सव

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात पानटपऱ्या बंदचे आदेश दिले. या आदेशाची संपूर्ण जिल्ह्यातील पानटपरीचालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली; मात्र छुप्या मार्गाने तंबाखू मावा, गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त आहे. तंबाखू शौकिनांची तलफ भागविण्यासाठी काही विक्रेत्यांनी घरात बसूनच तंबाखू पुड्या, मावा, गुटखा घरपोच मिळण्याची सुविधा सुरू केल्याची चर्चा आहे.

सुरवातीला पंधरा दिवसांच्या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांचे दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे होते; मात्र दिवसेंदिवस वाढती मागणी आणि मालाचा तुटवडा यामुळे विक्रेत्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची चढ्याभावाने विक्री करण्यात येत आहे. काही व्यापाऱ्यांनी तीनशे रुपये किलो सुपारीचा दर असताना पाचशे ते सहाशे रुपये दराने विक्री केली जात आहे. सुगंधित तंबाखूची विक्री दुप्पट, तिपटीने केली जात आहे. 

छुप्या मार्गाने गुटखा विक्री 
उमरगा शहरासह परिसरातील जवळपास दहा गावे कर्नाटक सीमेलगत आहेत. महाराष्ट्रात गुटखा विक्रीला निर्बंध असताना गुटख्याची विक्री होते. लॉकडाउनच्या काळात तर गुटख्याच्या एका पुडीचा दर चौपटीने वाढला, शौकिनांनी जिभेची चव पुरविण्यासाठी महागड्या गुटख्याचा स्वीकारही केल्याचे दिसून येते. छुप्या मार्गाने होणाऱ्या गुटखा वाहतुकीकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे.

अन्न प्रशासन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याच्या विक्रीला जणू मुभाच मिळत असल्याची चर्चा होत आहे. लॉकडाउनच्या काळात जिल्हा सरहद्द; तसेच आंतरराज्य सरहद्दीवर नाकाबंदी असताना दीड महिन्याच्या कालावधीत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल कुणाच्या आशीर्वादाने झाली, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Gutkha sales even during lockdown period