अनेक गरजूंच्या घरातील चुली पेटल्या

सयाजी शेळके
गुरुवार, 9 एप्रिल 2020

कोरोनाच्या संकटाने लॅाकडाऊन झाले अन् अनेकांच्या घरातील चुली बंद होण्याच्या मार्गावर आल्याने त्यांना आधार देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या झटत असल्याचे प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्याकडून त्यांच्या स्वत:च्या शेतातील ज्वारीसह गहू, तांदूळ आणि इतर किराणा साहित्य गरजूंना वाटप करीत आहे. कोरोनाच्या संकटाने लॅाकडाऊन झाले अन् अनेकांच्या घरातील चुली बंद होण्याच्या मार्गावर आल्याने त्यांना आधार देण्यासाठी राज्यातील युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या झटत असल्याचे सलगर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेकजण अडचणीत आले आहेत. यामध्ये उद्योगपतींसह सामान्य नागरिकालाही याची झळ बसली आहे. तर गरिबातील गरीब मनुष्य हैराण होत आहेत. जिल्ह्यासह राज्यातील अनेक कुटुंब दररोज कमावून चरितार्थ चालवितात. अर्थात दररोज मजुरी केल्याशिवाय त्यांच्या घरातील चूल पेटत नाही.

अशा नागरिकांना लॅाकडाऊनमुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने आधार देणे गरजेचा असते. त्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राज्यभर उपासमारीच्या मार्गावर असलेल्या कुटुंबाना जेवण दिले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील युवती कार्यकर्त्या त्या-त्या भागात जाऊन जेवण देत असल्याचे सलगर यांनी सांगितले. 

हेही वाचा :  बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे सक्षणा यांची शेती आहे. यंदाच्या वर्षात त्यांच्या शेतात ज्वारीचे उत्पादन चांगले झाले आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या संकटात त्यांनी ही ज्वारी गरिबांना वाटप करण्याचा संकल्प सुरू केला आहे. ज्वारीसोबत डाळ, साखर, तेल या वस्तूचेही वाटप त्या करीत आहेत.

प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपापल्या परिने गरजूंना मदत करावी. कोरोनाच्या विरोधातील हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. निश्चित यातून आपल्या देशाची, राज्याची सुटका होईल. कोरोणा विषाणूवर विजय मिळविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad help for needy citizens