शनिशिंगणापूर देवस्थानकडून उस्मानाबादकरांसाठी मदत

सयाजी शेळके
मंगळवार, 7 एप्रिल 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या दहा हजार किट्सचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

उस्मानाबाद : शनिशिंगणापूर देवस्थानकडून अन्नधान्याच्या १० हजार किट्स जिल्ह्यात वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॅकडाऊन झाल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने शनिशिंगणापूर देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यासह राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री गडाख यांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गरजूंना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी ‘कर्तव्य पार पाडा’चा नारा देत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही गडाख यांनी केले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रशासनाच्या मदतीने खऱ्या गरजूपर्यंत या वस्तू पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे, की सध्या सर्वजण मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. शासकीय यंत्रणा, पोलिस, आरोग्य खाते सर्वांसाठी धावत आहेत. संपूर्ण यंत्रणेला जनतेचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संकट परतविण्यासाठी उस्मानाबाद येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी दररोज जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी गोंधळून जाता कामा नये. संकटाचा सामना करताना आपले पद, राजकीय वाद, तसेच हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे, की आपले घर सोडू नका, घरी राहा काळजी घ्या. खूपच आवश्यकता असेल तरच बाहेर पडा. जिल्ह्यात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा अनेक कुटुंबांना लॉकडाऊनमळे दररोजच्या जेवणाचीही अडचण येत आहे.

मला अनेकांनी फोनवरुन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी मी माझी यंत्रणा लावून व्यवस्थाही केली. किराणा सामान नसल्याने गोरगरिबांच्या घरात अन्न शिजत नाही, हा आपल्या सर्वांचा पराभव आहे. विचार विमर्शानंतर मी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त यांच्याशी चर्चा करीत उस्मानाबाद जिल्ह्यातील गरजू नागरिकांना काही जीवनावश्यक वस्तू दिल्या पाहिजेत, असे निदर्शनास आणून दिले. त्यांनी तत्काळ माझ्या संकल्पनेला होकार दिला, असे त्यांनी सांगितले.

आपण जे काही करणार आहोत, ती मदत नसून कर्तव्य आहे. जे अत्यंत गरीब आहेत, ज्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातावर आहे. यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Help from Shanningshanapur Devasthan