esakal | तेलंगणाच्या सव्वाशे महिलांना साडी चोळीचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तेलंगणातील मजुरांच्या कुटुंबांना विजय जाधव यांनी परंपरा जपत नवीन कपड्यांचा आहेर केला. (छायाचित्र : सुभाष पांचाळ)

उमरगा : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांच्या कुटुंबांसाठी जाधव कुटुंबीयांनी परंपरा जपत नवीन कपड्यांचा आहेर केला.

तेलंगणाच्या सव्वाशे महिलांना साडी चोळीचा आहेर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : गावाकडे परतणाऱ्या तेलंगणाच्या मजुरांच्या साडेचारशे कुटुंबांना लॉकडाऊनमुळे रस्त्यातच थांबावे लागले. कर्नाटकच्या सीमेवरील पोलिसांनी त्यांची जबाबदारी नाकारली तर महाराष्ट्र पोलिस अन्‌ महसूल प्रशासनाने त्या मजुरांना स्वीकारले. त्यांच्या राहण्याची, भोजनाची गेल्या सोळा दिवसांपासून सोय केली.

प्रशासनाने केलेली सोय महत्त्वाची आहे, त्याबरोबरच औद्योगिक वसाहतीत मजुरांच्या बिऱ्हाडाला आश्रय देणारे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्या कार्याचेही कौतुक व्हायला हवे. दरम्यान, श्री. जाधव यांची पत्नी अनिता जाधव यांनी आलेल्या पाहुण्यांना परंपरेनुसार साडी-चोळी, टॉवेल-टोपी, लहान मुलांना कपडे देण्याचा स्तुत्य उपक्रम रविवारी (ता.१२) राबविला. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

कोरोना विषाणूच्या संसर्गाने मुंबईतील सर्व व्यवहार, व्यवसाय, बांधकाम बंद पडल्याने तेलंगणा राज्यातील मजुरांचे कुटुंब पाच वाहनांनी गुलबर्गा मार्गाने जात असताना २७ मार्चला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोलिसांनी कर्नाटकी हिसका दाखवत मजुरांना प्रवेश मार्ग नाकारला, मात्र येथील प्रशासनाने जवळपास ४६५ लोकांना स्वीकारत त्यांच्या राहण्याची, भोजनाची सोय उमरग्याच्या औद्योगिक वसाहतीतील विजय जाधव, अब्दुल सत्तार कारचे यांच्या प्लँटमध्ये केली. गेल्या सोळा दिवसांपासून मजूर कुटुंबांची या ठिकाणी दिनचर्या सुरू आहे. 

नवीन कपड्यांचा आहेर 
महाराष्ट्र, मराठवाड्याची संतांची भूमी धार्मिक, सांस्कृतिक परंपरेत महान आहे. संकटकाळात अडकलेल्या लोकांना अतिथी देवो भव... अशी परंपरा जपत श्री. जाधव हे गेल्या पंधरा दिवसांपासून मजुरांच्या कुटुंबाची काळजी घेताहेत. श्री. जाधव यांच्या पत्नी अनिता यांनी पाहुण्यांचा नवीन कपडे देऊन पाहुणचार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून पंचवीस हजार रुपये काढले. रविवारी १२७ महिलांना साडी-चोळी, २५ मुला-मुलींना नवीन कपडे आणि १३९ पुरुषांना टॉवेल-टोपीचा आहेर करण्याचा उपक्रम घेतला.

या उपक्रमाने महिला भारावून गेल्या होत्या, तर पुरुष मंडळींनी कृतज्ञता व्यक्त केली. मजुरांचा मुक्काम आणखी किती दिवस आहे, हे माहीत नाही. परंतु आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न केल्याचे श्रीमती जाधव यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून मजूर कुटुंबांच्या सेवेसाठी स्वयंसेवक म्हणून सुनील बिराजदार, जयवंत जाधव, अरविंद बिराजदार, दिगंबर सरवदे, रवी कटके, बाबा शेख, सलीम विजापुरे, शब्बीर शेख यांच्यासह पहारेकरी पंडित गायकवाड व त्यांच्या पत्नीने केलेले कामही कौतुकास्पद असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

loading image