हॉटस्पॉट भागातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच

दिलीप गंभिरे
मंगळवार, 19 मे 2020

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कळंब तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

कळंब (जि. उस्मानाबाद) : शहरासह तालुक्यातील पाथर्डी आणि हावरगाव येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील डॉक्टरसह अन्य व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे.

हावरगाव येथील रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचेही स्वॅब नमुने सोमवारी (ता.१८) निगेटिव्ह आले. ही दिलासादायक बातमी असली तरी हॉटस्पॉट भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांचा ओघ सुरूच असल्याने अद्यापही संकट असल्याचे समजून याचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे.

येथे क्लिक करा -  परजिल्‍ह्यातून आलेल्या हजारोंमुळे हिंगोलीची चिंता वाढली...

तालुक्यातील पाथर्डी येथील दोन; तसेच शहरातील एका व्यक्तीचा अहवाल गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुकावासीयांचा जीव भांड्यात पडला होता; मात्र पुन्हा हावरगाव येथे कुर्ला (मुंबई) भागातून आलेल्या दोन महिलांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच शहरातील शिवाजीनगर भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. हा रुग्ण ढोकी रस्त्यावरील एक खासगी रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये टेस्टसाठी येऊन गेला होता.

आरोग्य प्रशासन डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवून रुग्णालय सील करण्याची कारवाई केली होती. रुग्ण खासगी रुग्णालयात येऊन गेल्याची बातमी कानी पडताच या भागासह शहरवासीयामध्ये भीती निर्माण झाली आहे; पण पाथर्डी, हावरगावसह शहरातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. असे असले तरी हॉटस्पॉट भागातून नागरिकांचा ग्रामीण भागात येण्याचा ओघ सुरूच आहे.

त्यामुळे अशा लोकांचे गावातील कोरोना पथक आणि प्रशासन व नागरिकांनी वेगळ्या ठिकाणी दक्ष राहून विलगीकरण करण्यास पुढाकार घेतल्यास कोरोनाचे संकट टाळण्यास मदत होणार आहे. रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असले तरी संकट समजून नागरिकांनी घरातच थांबणे योग्य राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The influx of people from the hotspot area continues