esakal | परजिल्‍ह्यातून आलेल्या हजारोंमुळे हिंगोलीची चिंता वाढली...
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी बाधित झालेले जिल्हे आहेत. येथे जिल्‍ह्यातून कामानिमित्त गेलेले अनेक जण अडकलेले आहेत. ते आता जिल्‍ह्यात दाखल होत आहेत. त्‍यातच दोन दिवसांपूर्वी वसमत येथे मुंबई येथून आलेल्या सतरा जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. त्‍यापैकी आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यात बाहेर जिल्‍ह्यांतून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

परजिल्‍ह्यातून आलेल्या हजारोंमुळे हिंगोलीची चिंता वाढली...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरू झाले आहे. जिल्‍ह्यात परजिल्‍ह्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या १७ हजार १२९ जणांना होम क्‍वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही जण नियमांचे उल्‍लंघन करीत असल्याने नागरिकांची चिंता वाढत आहे.

राज्यात पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी बाधित झालेले जिल्हे आहेत. येथे जिल्‍ह्यातून कामानिमित्त गेलेले अनेक जण अडकलेले आहेत. ते आता जिल्‍ह्यात दाखल होत आहेत. त्‍यातच दोन दिवसांपूर्वी वसमत येथे मुंबई येथून आलेल्या सतरा जणांना क्‍वारंटाइन करण्यात आले होते. त्‍यापैकी आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या लोकांना लागलीच क्‍वारंटाइन केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. जिल्ह्यात बाहेर जिल्‍ह्यांतून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्‍ह्यात येणाऱ्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी
जिल्‍ह्यात येणाऱ्या या सर्वांची आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जात आहे. गावापातळीवर व्हीव्हीआरटी पथक तैनात असून ते बाहेरगावांतून आलेल्यांची नाव नोंदणी करून तपासणी करीत आहेत. त्‍यांची लक्षणे पाहूण पुढील सूचना देत आहेत. यात ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास त्‍यांना संस्‍थापक क्‍वांरटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच त्‍यांचे स्‍वॅबदेखील कोरोना चाचणीसाठी घेण्यात येत आहेत. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास त्‍यांना होम क्‍वारंटाइन करून त्‍यांच्या हातावर शिक्‍का मारला जात आहे. त्यांच्या घरावरदेखील रेड स्‍टीकर लावण्यात येत आहे.

हेही वाचा - Video - तब्बल ५६ दिवसांनी दिसले व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान...

नियमाचे उल्‍लंघन करीत असल्याच्या तक्रारी
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच समितीचे सदस्य त्‍यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवून आहेत. होम क्‍वारंटाइनचे नियम पाळणे त्‍यांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, यापैकी काही जण नियमांचे उल्‍लंघन करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दरम्‍यान, हिंगोली जिल्‍ह्यात (ता.एक) मेपासून आजपर्यंत १७ हजार १२९ नागरिक दाखल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून गावी परतीसाठी परवानगी मिळत असल्याने येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा - ना बँडबाजा, ना बारात, दुचाकीवर वरात

तालुकानिहाय दाखल संख्या
आतापर्यंत हिंगोली तालुक्‍यात सात हजार ६६२ नागरिक दाखल झाले आहेत. वसमत तालुक्‍यात तीन हजार ६५ नागरिक आले आहेत. सेनगाव तालुका तीन हजार १२७, कळमनुरी दोन हजार ७२६, औंढा नागनाथ तालुक्‍यात एक हजार ५४४ नागरिक दाखल झाले आहेत. ते होम क्‍वारंटाइनमध्ये आहेत. दरम्‍यान, अनेक ग्रामपंचायत प्रशासनाने गावात आलेल्या नागरिकांना जिल्‍हा परिषद शाळेत ठेवल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

सेनगाव तालुक्‍यात सात हजार २०६ नागरिकांची घरवापसी
सेनगाव ः तालुक्‍यातून कामानिमित्त स्‍थलांतरित झालेले व लॉकडाउनमध्ये अडकलेले सात हजार २०६ नागरिक परतले असून मे महिन्यांत दोन हजार ७८५ नागरिक बाहेरगावांहून आले आहेत.
लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाल्याने मोठ्या शहरात स्थलांतरित झालेले नागरिक आता गावी परतत आहेत. रविवारपर्यंत (ता.१७) सात हजार २०६ नागरिक दाखल झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी महिन्यात आजपर्यंत दोन हजार ७८५ स्थलांतरित नागरिक दाखल झाले आहेत. त्‍यांच्या नोंदी आशा वर्करकडून घेण्यात येत आहेत. या नागरिकांना गावातील जिल्हा परिषद शाळा शेत व घरात विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्‍यांना विविध सूचना देखील देण्यात येत आहेत. दरम्यान, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलिस व आरोग्य विभागाकडून सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाहेरून येणाऱ्यांच्या आरोग्य विभागास माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्दी, खोकला असल्यास त्‍याची तपासणीदेखील करावी, असे सांगण्यात आले आहे.