मुंबईहून सायकलने गाठले पाचशे किलोमीटरवरील गाव

अविनाश काळे
रविवार, 29 मार्च 2020

दिवसाच्या बारा तासांत आठ तास प्रवास अन्‌ चार तास आराम; तसेच रात्रीही असेच वेळापत्रक आखून देवानंद शनिवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता गावात पोचला.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव वाढण्याच्या भीतीने संपूर्ण जग हादरले आहे. राज्याची राजधानी मुंबईत या आजाराची कमालीची भीती निर्माण झाल्याने आष्टाकासार (ता. लोहारा) येथील एक तरुण लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने गावाकडे चक्क सायकलवरून प्रवास करीत आला. पाचशे किलोमीटरचे अंतर कापून चौथ्या दिवशी शनिवारी (ता. २८) सायंकाळी तो गावात पोचला.

ग्रामीण भागातील हजारो तरुण रोजीरोटीसाठी मुंबई, पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. महामंडळाच्या व खासगी बसही बंद झाल्या. 
आष्टाकासार (ता. लोहारा) येथील तरुण देवानंद चौधरी गेल्या दहा वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी मुंबईच्या कुर्ला मार्केट परिसरात राहतो. तो नामांकित हॉटेल ताजमध्ये कॅन्टीनमध्ये कामाला आहे; मात्र व्यवस्थापनाने हॉटेल बंद केल्याने उपाशीपोटी राहण्याची वेळ आली. शिवाय येणाऱ्या काळात या आजारापासून आपण सुरक्षित राहू की नाही, याची भीती होती.

हेही वाचा - इस्लापूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात

त्यामुळे देवानंदने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला; पण वाहतूक बंद बसल्याने जाणार कसे, असा प्रश्न भेडसावत होता. या चिंतेने ग्रासलेल्या देवानंदने सायकलने जाण्याचा निश्चय केला. बुधवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता देवानंद कुर्ला येथून निघाला. त्यादिवशी रात्री अकरापर्यंत त्याने प्रवास केला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला दोन तास आराम केला. दिवसाच्या बारा तासांत आठ तास प्रवास अन्‌ चार तास आराम; तसेच रात्रीही असेच वेळापत्रक आखून देवानंद शनिवारी (ता.२८) सायंकाळी सहा वाजता गावात पोचला.

दरम्यान, बापूराव पाटील युवा मंचचे शिवकांत पतगे, अमित पांचाळ, बसवराज बमचंडे, संदीप लिंबाळे, नागेश गुड्डा, जगदीश वरकले, राहुल स्वामी, योगेश पतंगे, कलय्या स्वामी या कार्यकर्त्यांनी सोलापूर ते उमरगा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या प्रवाशांसाठी कलिंगडचे वाटप सुरू केले आहे. यावेळी देवानंदच्या सायकल प्रवासाची माहिती मिळाली. त्यानंतर देवानंदशी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे संवाद साधून सायकलिंग प्रवासाविषयी माहिती घेतली. 

लॉकडाऊनमुळे मुंबईसारख्या शहरात स्मशानकळा होती. येणारा काळ खाण्या-पिण्यासाठी कठीण जाण्याची लक्षणे दिसत असल्याने सायकलवरून गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. प्रवासासाठी चार दिवस लागले. गावात आल्यानंतर आईसह कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली अन्‌ समाधान वाटले. गावाकडचे वातावरण सुरक्षित वाटते. आरोग्य तपासणीसाठी सरपंचाचे बोलावणे आले होते, तपासणीही केली; काही त्रास नाही; पण सायलिंगमुळे गुडघेदुखी वाढल्याने घरात आराम करतो आहे. 
- देवानंद चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad At Last He Reached To Home From Mumbai On Cycle