इस्लामपूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात 

प्रकाश काळे
रविवार, 29 मार्च 2020

इस्लामपूरमधून तालुक्यातील ऊसतोड मजूर शनिवारी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी तालुक्यात दाखल झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच मोठ्या शर्थीने या नागरिकांशी संपर्क करून सर्वांना मध्यरात्री बारा वाजता किल्लेधारूर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे

किल्लेधारूर (जि. बीड) - इस्लामपूर (जि. सांगली) येथून किल्लेधारूर तालुक्यात आलेल्या सहा मजुरांसह ३२ जणांना शनिवारी (ता. २९) मध्यरात्री आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना विलगीकरण कक्षात (क्वारंटाइन) ठेवले आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत असून, १४ दिवस आरोग्याची दररोज तपासणी केली जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील तब्बल २३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने राज्यात खळबळ उडाली. याच इस्लामपूरमधून तालुक्यातील ऊसतोड मजूर शनिवारी आपल्या मूळ गावी परतण्यासाठी तालुक्यात दाखल झाले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळताच मोठ्या शर्थीने या नागरिकांशी संपर्क करून सर्वांना मध्यरात्री बारा वाजता किल्लेधारूर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यांची दररोज आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

१४ दिवस हे नागरिक विलगीकरण कक्षात राहणार आहेत. हे सर्व ऊसतोड कामगार असून, तालुक्यातील खोडस येथील एकाच कुटुंबातील तीन व संगम येथील एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व मजूर एकाच वाहनातून प्रवास करून आलेले आहेत. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ऊसतोड कामगार असल्याने सदरील आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

याबाबत नायब तहसीलदार सुहास हजारे व पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांनी याबाबत सतर्कता दाखविली. लवकर विलगीकरण कक्षांची संख्या वाढविणार असल्याचे सांगितले. खोडस येथील तिघांचा इतर व्यक्तींशी संबंध आल्याने अशा २६ लोकांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under the supervision of the laborers returning from Islampur