esakal | पत्रकारांच्या लसीकरणास नियमांची आडकाठी!
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

पत्रकारांच्या लसीकरणास नियमांची आडकाठी!

sakal_logo
By
सयाजी शेऴके

उस्मानाबाद: जिल्ह्यातील पत्रकार जोखीम पत्करून काम करीत असताना त्यांच्या लसिकरणाबाबात प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखविला जात नाही. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यातील पत्रकारांचे दुसरे डोसही पूर्ण झालेत मात्र अजूनही उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकारांसाठी नियमांची आडकाठी घातली जात आहे.

जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक घटक प्रयत्न करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील डॉक्टर्स, नर्स, दवाख्यान्यीतल सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय महसूल यंत्रणा, पोलिस प्रशासन, शिक्षकवर्ग यांचेही योगदान मोठे आहे. या घटकांसह प्रसार माध्यमांचे कामही दखल घेण्याइतपत आहेच.

जिल्ह्यातील अनेक पत्रकार कोरोना संसर्गाच्या संदर्भात जनजागृतीचे काम करीत आहेत. कोरोना विषयक माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून केले जाते. दररोज शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो पत्रकार कोरोनाच्या लढ्यात तत्परता दाखवित आहेत. जोखीम पत्करून काम करीत असताना प्रशासनाला मात्र त्यांच्या कामाची दखल घ्यावीशी वाटलेली नाही. 45 वर्ष वयाची अट असल्याचे सांगत लसीकरणासाठी टाळाटाळ केली जात आहे.

बाहेरच्या जिल्ह्यात दोन्ही डोस पूर्ण
औरंगाबाद, नागपूर अशा जिल्ह्यात पत्रकारांना विशेष मोहिम म्हणून लसीकरण मोहिम राबविली. विशेष म्हणजे त्यांचे लसीकरण मार्च महिन्यातच सुरू केले होते. यातील बहुतांश पत्रकारांनी दुसराही डोसही पूर्ण केला आहे. मात्र जिल्ह्यातील पत्रकारांना अद्यापही लसीकरणाची मोहिम सुरु केलेली नाही.

फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना योद्धे म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. याशिवाय सध्या सर्व शाळा बंद आहेत. तरीही शिक्षकांचे लसीकरण पूर्ण केले. या सर्वांचे लसीकरण ही बाब समर्थनीयच आहे. त्यांचे लसीकरण गरजेचेच होते. पण, जिल्ह्यातील पत्रकारही कोरोना योद्धे, फ्रंटलाईन वर्क्स या नियमात बसू शकतात. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र पत्रकाराच्या लसीकरण मोहिमेस नियमांची आडकाठी असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून यासाठी 45 वर्षे वयाची अट घातल्याने जिल्ह्यातील अनेक पत्रकार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या लसीकरणाची मोहिम सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकार वर्गातून होत आहे.