दोन एकरातील टरबूज जागेवरच खराब

सयाजी शेळके
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोणाच्या प्रादुर्भावाने अनेकांवर संकट आले आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प असल्याने दोन एकरातील टरबूज जागेवरच खराब झाले आहेत. 

उस्मानाबाद : येडशी (ता. उस्मानाबाद) येथील गुरुनाथ पताळे यांच्या शेतातील दोन एकरातील टरबूज जागेवरच खराब झाले आहेत. मशागतीसाठी दोन लाख रुपये खर्च झाले असून, लॉकडाऊनमुळे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प असल्याने खर्चही निघणे कठीण असल्याने मोठे आर्थिक संकट आल्याचे श्री. पताळे यांनी सांगितले.

कोरोणाच्या प्रादुर्भावाने अनेकांवर संकट आले आहे. अनेकांना बेरोजगार बनविले आहे. शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येडशी येथील शेतकरी पताळे यांनी ऑक्टोबर महिन्यात टरबूजाची लागवड केली. त्यापूर्वी त्यांनी त्यासाठी मशागत म्हणून दोन वेळा जमिनीची नांगरट, एक वेळा मोगडणी केली. त्यानंतर मल्चिंग करून त्यांनी टरबूजाची लागवड केली. त्यासाठी रोपवाटीकेतून रोपे मागविली. लागवडीनंतर खतांची मात्रा, तसेच किटकनाशक फवारणी केली. शिवाय पाण्याचेही योग्य नियोजन केले.

त्यामुळे टरबूजाची वाढ चांगल्या पद्धतीने झाली. फलधारणा झाल्यानंतर पिकाकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे चांगल्या दर्जाचे टरबूजाचे उत्पादन झाले. १५ मार्चपर्यंत काही व्यापारी येऊन विचारीत होते. काहीजणांनी चार दिवस थांबा, दोन दिवस थांबा म्हणत २० मार्च उजडला. त्यानंतर संचारबंदी सुरू झाली. त्याचवेळी टरबूजाचे उत्पादन भरगच्च आले होते. काढणीयोग्य माल झाला होता. मात्र संचारबंदी असल्याने व्यापारी फिरकले नाहीत. अखेर उन्हाचा चटकाही वाढला. त्यामुळे वेलांचा आयुष्यकाळ संपला.

हेही वाचा- धक्कादायक घाटी रुग्णालयात ब्रदरला कोरोनाची लागण

परिणामी टरबूज जागेवरच सडू लागले. दोन-चार दिवसात संपूर्ण बागच खराब झाल्याचे चित्र तयार झाले. अखेर एक एप्रिलच्या दरम्यान सर्वच माल जाग्यावर नाहीसा झाला. उन्हामुळे टरबूजाची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली. उत्पादन घेण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले. तेवढेही उत्पादन निघाले नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पताळे यांनी दिली आहे. 

लागवड केल्यानंतर चांगली मेहनत केली. त्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळेल, याची खात्री झाली होती. सुमारे ५५ टन माल निघण्याची आशा होती. दर्जेदार मालही मिळाला. मात्र बाजाराअभावी दोन एकरावरील टरबूज वाया गेले आहे. एवढे नुकसान होईल, असे वाटले नव्हते. संचारबंदी असली तरी किमान विक्री होऊन, झालेला खर्च तरी निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही फोल ठरल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. 
- गुरुनाथ पताळे, येडशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad loss of farmers too