ना वरात, ना वऱ्हाड; साधेपणाने जुळल्या रेशीमगाठी

जावेद इनामदार
Thursday, 11 June 2020

लग्नासाठी होणारा अवाढव्य खर्चाला फाटा बसला आहे. यामुळे अनेक कुटुंबाचे लग्नावर खर्च होणारे लाखो रुपये वाचले आहेत.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे लग्नात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे. ना वरात, ना वऱ्हाड मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे पार पडत आहेत. केसरजवळगा येथे ही गुरुवारी (ता.११) पटवारी कुटुंबातील दोन युवकांचा विवाहसोहळा घरातच मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आनंदात पार पडला.

लॉकडाउनच्या काळातही सरकारच्या नियमानुसार विवाहसोहळे पार पडत आहेत. केसरजवळगा येथील गोविंदराव पटवारी यांचे सुपुत्र रवींद्रनाथ आणि नितीन या दोन्ही मुलांचा विवाह गुरुवारी साधेपणाने घरात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. खरोसा (ता. औसा) येथील चंद्रकांत यशवंत मुसांडे यांची मुलगी वनिता हिचा रवींद्रनाथ याच्यासोबत, तर मंटगी (ता. आळंद, कर्नाटक) येथील सुभाष होलसुरे यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह नितीनबरोबर विवाह झाला.

औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ? 

आज सकाळी दहा वाजता हे दोन्ही जोडपी विवाहबंधनात अडकले. कुटुंबातील मोजकेच नातेवाईक अन्‌ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. गावचे सरपंच बलभीम पटवारी यांचे हे दोन्ही कनिष्ठ बंधू आहेत. ना वरात, ना बॅंडबाजा, ना कुठलाही झगमगाट अगदी साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा घरातच पार पडला.

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध  

कोरोना आणि लॉकडाउनमुळे होणारे विवाहसोहळे पिढ्यान्‌पिढ्या लक्षात राहतील. कोरोनाने समाजाला एक वेगळी दिशा दिली आहे. लग्नासाठी होणारा अवाढव्य खर्चाला फाटा बसला आहे. यामुळे अनेक कुटुंबाचे लग्नावर खर्च होणारे लाखो रुपये वाचले आहेत. लॉकडाउनमुळे यावर्षी अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकलले आहेत, तर काहीजण मुहूर्ताला महत्त्व देत सरकारच्या नियमाचे पालर करीत नियोजित मुहूर्तावरच लग्न सोहळे आटोपण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about Wedding ceremony