Osmanabad News : शेतीपंपाच्या विजेचा खेळखंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agricultural pump

Osmanabad News : शेतीपंपाच्या विजेचा खेळखंडोबा

उस्मानाबाद : शेतीपंपाच्या वीजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची मागणी वाढताच हा प्रकार सुरू झाला आहे. तर जिल्ह्यातील काही गावात एकदिवसाआड वीजेचा पुरवठा करावा लागत आहे. त्यातच वीजबील भरणा करण्याची मागणी सुरू झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने पिके पाणी देण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यामुळे वीजेची मागणी वेगाने वाढली आहे.

विद्युतपंप सुरू होताच, अपुऱ्या व्होल्टेजमुळे वीजखंडीत होते. उपकेंद्रात वीजेची मागणी वाढल्याने सर्वच वीज पुरवठा बंद ठेवावा लागतो. शेतकऱ्यांच्या भाषेत ‘ट्रीप’ असा उल्लेख करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा विद्युतपंप सुरू करण्यासाठी विहिरीकडे वळावे लागते. हा प्रकार शेतकरी दिवसा समजून घेतात. मात्र जिल्ह्यात अलटूनपालटून रात्री १० वाजता वीजपुरवठा सुरू होतो. त्यात तापमान कमी झालेले असते. हुडहुडी भरत असताना वीजेचा खेळ होत असल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच फजीती होते. त्यात वीजबीलभरणा करण्याचा तगादा सुरू झाल्याने शेतकरी हताश होत आहेत. अखंडीत वीजपुरवठा होत नाही, अन वीजबील भरा, अशी मागणी झाल्याने शेतकरी वैतागले आहेत.

मुंबई-पुण्यासारख्या भागात अर्धातास वीजपुरवठा खंडीत झाला तर आरडाओरड सुरू होते. मात्र अपुरी वीज असल्याने जिल्ह्यातील काही गावात एकआडदिवस वीज पुरवठा केला जातो. म्हणजे आज वीज सुरू असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तासानंतर वीजपुरवठा केला जातो. त्यातही अपुऱ्या व्होल्टेजमुळे अखंडीतपणे वीज दिली जात नाही.

कामे वेगाने होतील?

उस्मानाबाद आणि तळजापूर तालुक्यात १० नवीन सबस्टेशन प्रस्तावित आहेत. त्यामुळेही मागणी काही प्रमाणात पूर्ण होऊ शकते. त्यासाठी या सबस्टेशनची कामे त्वरीत मार्गी लागणे अपेक्षित आहे. याशिवाय ४९ ठिकाणी अतिरीक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही त्याची कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे अशी कामे त्वरीत सुरू करून वीजपंपाच्या वीजेची मागणी पूर्ण करावी लागणार आहे.