लॉकडाउनमध्येही मिळवला लाखोंचा नफा

नंदकुमार जाधव
Wednesday, 20 May 2020

कंपनीतील नोकरी सोडून एकाने आधुनिक पद्धतीतून शेती करीत टरबूज लागवडीतून खर्च वगळता लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. या शेतकऱ्याने ४५ टन माल परदेशात पाठविला.

माडज (जि. उस्मानाबाद) : कंपनीतील चांगली नोकरी सोडून एकाने आधुनिक पद्धतीने शेती करीत अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. एक हेक्टरमध्ये टरबुजाची लागवड करीत लॉकडाउनच्या कालावधीतही एकूण खर्च वगळता १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

लागवडीचा वाढलेला खर्च, पावसाची कमतरता, पिकांचे घटलेले उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करून येथील शेतकरी फळबागेकडे वळले आहेत. माडज हे गाव दहा हजार लोकसंख्येचे असून, नगदी पीक म्हणून ऊस, पपई, केळी, आंबा, अंजीर आदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरीप हंगामात उडीद, सोयाबीन, साळ, तूर आदी पिके घेतली जातात.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, करडई, हरभरा आदी पिके घेतली जातात व पारंपरिक पिकासाठी होणारा खर्च व त्यातून मिळणारा नफा याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. त्यामुळे माडज येथील संताजी मधुकर गायकवाड यांनी शेतीत नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. त्यांचे शिक्षण ‘एमबीए’पर्यंत झाले आहे.

ठिबक सिंचनच्या एका कंपनीतील नोकरी सोडून ते शेती करीत आहेत. त्यांनी आपल्या एक हेक्टरमध्ये टरबुजाची लागवड नऊ मार्चला केली. वैजापूर येथून तीन हजार पाचशे रुपयांचे बियाणे खरेदी केले. एक हेक्टरमध्ये एकूण खर्च दोन लाख ५० हजार झाला. या एक हेक्टरला ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन केले.

हाफकिनच्या सहकार्याने लसीचे संशोधन, मंत्री अमित देशमुख

कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार खताची मात्रा, कीटकनाशकाची फवारणी योग्य पद्धतीने केली. ११ मे रोजी त्यांच्या शेतातील कलिंगडाची पहिली तोड करण्यात आली. लॉकडाउन असल्यामुळे शासनाची परवानगी घेऊन मुंबईपर्यंत कंटेनरने माल वाहतूक केली. या कलिंगडची त्यांनी निर्यात केली. ४५ टन माल परदेशात पाठविण्यात आला.

एका टरबुजाचे वजन साधारण साडेतीन किलोंच्या पुढे आहे. त्याची किमान दर २५ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली. पहिल्या टप्प्यात ४५ टन माल विक्री झाला. एकूण खर्च वजा जाता १० लाखांचे उत्पन्न मिळाले. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० ते ५० टन माल अपेक्षित आहे. तो काढणीसाठी पंचवीस मेपर्यंत येणार आहे, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Profit earned even in lockdown