Osmanabad : उस्मानाबादला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Heavy Rain

Osmanabad : उस्मानाबादला पावसाने झोडपले

उस्मानाबाद : शहराला रविवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास पावसाने झोडपले. सुमारे एक तासभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घुसले होते. दरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यात मुक्काम वाढविल्याने शेती कामाला याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यात सोयाबीन काढणीच्या तोंडावर पावसाची रिपीप सुरू झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

हेही वाचा: Osmanabad : ठाकरे-शिंदे गटात घोषणाबाजी, आरडाओरडीची रंगली जुगलबंदी

शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू झाल्या. सकाळी सात वाजता पाऊस सुरू झाला. त्यानंतर सुमारे तासाभराने पावसाने उघडीप दिली. पुन्हा नऊच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पावसाचा हा लपंडाव दिवसभर सुरू होता. दरम्यान सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शहरवाशीयांची चांगलीच दाणादाण उडविली. पावसाचा जोर जास्त असल्याने नाल्यासह रस्त्यावर पाणी दिसत होते. त्यामुळे अनेक इमारतीमध्येही पाणी घुसले. नालीचे पाणी काही दुकानामध्येही घुसल्याने व्यापारी वर्गाची पळापळ झाली. वस्तु भिजू नयेत, यासाठी पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते. दरम्यान अर्ध्या तासाच्या अंतराने पुन्हा शहरात पावसाने सुरूवात केली. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

हेही वाचा: Osmanabad : तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन

सोयाबीनची दाणादाण

जिल्ह्यात यंदा सोयाबीनची स्थिती जेमतेम आहे. त्यात परतीचा पाऊस मुक्काम वाढवत आहे. दोन दिवसात पाऊस संपेल, असा हवामानाचा अंदाज होता. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवाय दररोज पावसाची हजेरी लागत आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ दिवसातून पाच-सहा वेळेस पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. त्यामुळे शेतातील सोयाबीन काढणीच्या कामास चांगलाच अडसर ठरत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसामुळे सोयाबीन काढणी पुढे ढकलावी लागत आहे. आज-उद्या पाऊस थांबेल, या आशेवर शेतकरी आहेत. अशा स्थितीत पाऊस दररोज हजेरी लावत असल्यामुळे काढणीचा हंगाम लांबणीवर पडत आहे. या चालू परिस्थितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.