उमरग्यातील धोका अजून टळला नाही!

अविनाश काळे
Saturday, 23 May 2020

पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील सातपैकी चार जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर तीन इनक्ल्यूसिव आले आहेत. 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : तब्बल ४६ दिवसानंतर पुन्हा एका २७ वर्षीय महिलेचा तपासणी अहवाल गुरूवारी ( ता.२१) पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. महिलेसह ३१ जण मुंबई (कांदीवली) येथून आले होते. दरम्यान प्रशासनाने त्या महिलेच्या संपर्कातील सात नातेवाईकांसह अन्य सहा असे तेरा नातेवाईकांचा स्वॅब शुक्रवारी (ता. २२) सकाळी लातूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी मध्यरात्री प्राप्त झाला. त्यात महिलेच्या संपर्कातील सातपैकी चार जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर तीन इनक्ल्यूसिव आले आहे.

कर्नाटकातील आळंद तालुक्यातील महिला पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह कामासाठी मुंबईच्या कांदिवली भागात वास्तव्यास होती. रविवारी (ता. १७) पहाटे तीन वाजता ती महिला व अन्य तीस जण खासगी बसने शहरात दाखल झाले होते. त्यात तालुक्यातील हिप्परग्याचे दहा, शहरातील एकोंडीवाडी शिवारातील शेतात राहिलेले महिलेसह आठ जण, शहरातील जकापुर कॉलनी येथे तीन तर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळ नऊ जण असे ३१ जणांचा समावेश होता.

ही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन  

कोवीड रूग्णालयात तपासणी करून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. महिला, दोन मुले व नातेवाईकांना होम क्वारंटाईन केल्यानंतर प्रथम ती शहरातील न्यू बालाजी नगर येथे मुंबईच्याच नातेवाईकाच्या घरात गेली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना राहण्यास विरोध केला. त्यामुळे ती महिला, दोन मुले व अन्य पाच जण एकोंडीवाडी शिवारातील नातेवाईकाच्या शेतात रहात होते.

मंगळवारी (ता.१९) दुपारी अचानक महिलेस श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने शहरातील कोवीड रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी दुपारी त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तब्बल ४६ दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने तालुका व शहराच्या सीमा बंद करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिल्या आहेत. 

चार जणांचा अहवाल निगेटिव्ह 
महिलेच्या दोन मुलासह नातेवाईकांचे सात व एक इनक्ल्यूसिव असे आठ स्वॅब शुक्रवारी सकाळी सात वाजता तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात आले होते. तर दुपारी क्वांरटाइनमध्ये असलेले व आजाराची लक्षणे दिसणाऱ्या पाच जणांचे स्वॅब दुपारी पाठविण्यात आले आहेत. सध्या त्या बाधित महिलेवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून स्वॅब घेतलेले तेरा जण संशयित कक्षात आहेत. तर त्या महिलेसोबत एकाच बसमध्ये आलेल्या चोविस जणांना बहुजन वस्तीगृहात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान सकाळी पाठवलेल्या आठ जणांपैकी बेडगा येथील एकाचा पूर्नतपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर महिलेच्या संपर्कातील हॉयरिस्कमधील सातपैकी चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यात त्या महिलेच्या पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर तीन इनक्ल्यूसिव अहवालात महिलेच्या नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या तीनही इनक्ल्यूसिव लोकांचे स्वॅब पुन्हा तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The report of four people in contact with a positive woman is negative