मध्य प्रदेशातील मजुरांच्या कुटुंबीयांची घरवापसी

अविनाश काळे
Monday, 18 May 2020

उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत बालाजी इंडस्ट्रीज येथे सिमेंटच्या विटा तयार करणासाठी कामावर असलेल्या दहा कुटुंबातील लहान मुलांसह एकूण ४१ जणांना रविवारी सकाळी सोलापूरपर्यंत दोन बसने पोचवण्यात आले. तहसीलचे कर्मचारी डी. ए. पवार, समुपदेशक विजय जाधव यांनी प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

उमरगा : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परराज्यांतील लोकांना महसूल प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे घरवापसीचा मार्ग खुला झाला आहे. गेल्या सहा दिवसांत विविध राज्यांतील ४३२ लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी बस, रेल्वेची सोय करण्यात आली तर काही लोक खासगी वाहनाने गावाकडे परतले आहेत. दरम्यान, येथील औद्योगिक वसाहतीत सिमेंटच्या विटा तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील ४१ मजुरांना रविवारी (ता. १७) सकाळी सात वाजता दोन बसने सोलापूरपर्यंत पाठवण्यात आले. सकाळी अकरा वाजता रेल्वेने ते मार्गस्थ झाले.

उमरगा तालुक्यात उदरनिर्वाहासाठी बिहार, गुजरात, झारखंड, हरियाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थानातील अनेक लोक गेल्या दोन-तीन वर्षांपासून वास्तव्यास आहेत.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या वातावरणामुळे लॉकडाउन आहे. या काळात व्यवसाय बंद पडला. शिवाय काम बंद असल्याने पोटासाठी मिळणारा रोजगारही बुडाला. त्यामुळे अशा स्थितीत येथे राहणे कठीण झाल्याने कामगार, मजुरांनी मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. शासनाने परतीच्या प्रवासासाठी सवलत दिली तीही मोफत. 

अकरा बसची केली सोय 
उमरगा तहसील कार्यालयात आतापर्यंत परराज्यांतील ६८५ लोकांनी घरवापसीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४३२ लोकांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशाची होती. त्यांना सात बसने औरंगाबादपर्यंत सोडण्यात आले. मध्य प्रदेशातील लोकांना तीन बस तर गोंदिया जिल्ह्यातील तरुण कामगारांना एका बसची सोय करण्यात आली होती. तर काही लोक खासगी वाहनांनी प्रशासनाची परवानगी घेऊन गावाकडे परतले आहेत.

दरम्यान, उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत बालाजी इंडस्ट्रीज येथे सिमेंटच्या विटा तयार करणासाठी कामावर असलेल्या दहा कुटुंबातील लहान मुलांसह एकूण ४१ जणांना रविवारी सकाळी सोलापूरपर्यंत दोन बसने पोचवण्यात आले. तहसीलचे कर्मचारी डी. ए. पवार, समुपदेशक विजय जाधव यांनी प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

मध्य प्रदेशातील मजुरांचे कुटुंब गेल्या एक वर्षापासून सिमेंटच्या विटा तयार करण्याच्या कामासाठी होते. लॉकडाउनमुळे कामावर निर्बंध आले. त्यांना जेवणाची सोय केली होती; मात्र गावाकडे जाण्याची प्रबळ इच्छा असल्याने तहसील कार्यालयाकडे नोंदणी केली. अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने मजुरांच्या जाण्याचा मार्ग खुला झाला. 
- संदीप जाधव, बालाजी इंडस्ट्रीज, उमरगा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Return of families of laborers from Madhya Pradesh