esakal | दोन एकरांवरील गुलाबाची फुले कोमेजली
sakal

बोलून बातमी शोधा

जकेकूर (ता. उमरगा) : लॉकडाऊनमुळे दोन एकर क्षेत्रातील गुलाबाची कोमेजलेली फुले.

उमरगा : लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींच्या मुळांसाठी प्रसिद्ध असलेल्या शतावरीचाही संबंधित कंपनीकडून उठाव होत नसल्याने पदरमोड करून ती वनस्पती शेतीतून बाहेर काढावी लागली. 

दोन एकरांवरील गुलाबाची फुले कोमेजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील एका तरुण शेतकऱ्याला आधुनिक शेती प्रयोगातून आर्थिक समृद्धीचा यशस्वी मार्ग मिळाला होता; मात्र साधारणतः २५ दिवसांत बाजारपेठेचे सर्वच मार्ग बंद झाल्याने डोळ्यांदेखत दोन एकर क्षेत्रावरील गुलाबाची फुले झाडालाच कोमेजून, सुकून गेली आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींच्या मुळांसाठी प्रसिद्ध असलेल्या शतावरीचाही संबंधित कंपनीकडून उठाव होत नसल्याने पदरमोड करून ती वनस्पती शेतीतून बाहेर काढावी लागली.

येथील अविनाश थिटे हे तरुण शेतकरी जकेकूर शिवारातील शेतीत आधुनिक पद्धतीच्या पिकाच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग गेल्या पाच-सहा वर्षांपासून करताहेत. दोन एकर क्षेत्रातील शेडनेटमध्ये काकडी, सिमला मिरची, दोडके आदी पालेभाज्यांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. गुलाबाच्या फुलशेतीचा प्रयोग एक वर्षापासून सुरू केला आहे.

दोन एकरांत ३२ हजार गुलाबाची झाडे आहेत. वर्षभरात फुलांचे उत्पन्न सुरू असते, मात्र उन्हाळ्यात लग्नसराईत फुलांना मिळणारा दर फायदेशीर ठरतो. परंतु यंदा लग्नसराई सुरू झाल्यानंतर लागलीच कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाले आणि केलेल्या मेहनतीवर पाणी पडले. १५ मार्चपूर्वी एका फुलाला आठ ते दहा रुपयांचा दर होता. मात्र आता झाडालाच फुले सुकून गेली आहेत. पाकळ्या अस्ताव्यस्त पडताहेत.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

फुलांसाठी हैदराबादची बाजारपेठ आहे. लॉकडाऊनने कुठलेही लग्नसमारंभ अथवा अन्य कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळे मागणी नाही. स्थानिक बाजारपेठेतील फुलाऱ्यांनीही व्यवसाय बंद केल्याने विक्रीला वाव नसल्याने फुलांची तोडणी थांबली. लॉकडाऊन झाल्याने सालगडी स्वतःच्या गावी गेला. सुकलेली फुले तोडण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. लग्नसराईत फुलांची मोठी मागणी असते. ऐन त्याच काळात लॉकडाऊन झाल्याने दीड लाखाचे आर्थिक उत्पन्न बुडाले. 

गुणकारी शतावरीनेही दिला फटका 
आयुर्वेदिक औषधासाठी गुणकारी असलेल्या शतावरीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १६ आहे. मात्र लॉकडाऊनने सर्वच शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. शतावरी वनस्पतीच्या मुळांची खरेदी संबंधित कंपनीकडून केली जाते. कंपनीकडून रोपे दिली जातात, त्याची रक्कम शेतकऱ्यांना लगेच द्यावी लागते. श्री. थिटे यांनी सव्वाएकरात दोन हजार रोपांची लागवड केली. प्रत्यक्ष उत्पन्न मिळण्याचा कालावधी १८ महिन्यांचा आहे.

६० हजार रोपांसाठी तर औषध व इतर खर्च ४० हजार रुपये झाला. डिसेंबर महिन्यात उत्पन्न हाती आले होते; मात्र संबंधित कंपनी माल घेण्यासाठी आली नाही. दोन महिने प्रतीक्षा केली. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे संबंधित कंपनीचे कर्मचारी माल नेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे श्री. थिटे यांनी मजुरांकरवी व ट्रॅक्टरने शतावरीच्या झाडाखाली खोदून गड्डे काढले, त्यातील मुळा बाजूला काढण्यासाठी पदरमोड केली. 

गुलाबशेतीचा पहिल्यांदाच फटका बसला आहे. दोन एकरांतील सुकलेल्या फुलांना पाहून मन सुन्न होते; पण लॉकडाऊनमुळे नाइलाज झाला आहे. ऐन सिझनमध्ये फुले जागेवरच असल्याने दीड लाखाचा फटका बसला, तर १८ महिने जोपासलेल्या शतावरीचा जवळपास तीन लाखांचा आर्थिक फटका बसला. 
- अविनाश थिटे, शेतकरी, उमरगा.