esakal | आमदार पवार यांच्याकडून सहाशे लिटर सॅनिटायझर
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

जिल्ह्यासाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने सहाशे लिटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.

आमदार पवार यांच्याकडून सहाशे लिटर सॅनिटायझर

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : उस्मानाबादकरांच्या मदतीला कायमच बारामतीकर पुढाकार घेतात. कोरोनामुळे उद्‍भवलेल्या आपत्तीमध्ये पवार कुटुंबीयांच्या पिढीनेही तीच परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने सहाशे लिटर सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.

बारामतीकरांच्या माध्यमातून जिल्ह्याला बऱ्याच गोष्टी आजपर्यंत मिळालेल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत नवीन पिढीतील रोहित पवार हेसुद्धा जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. शरद पवार यांनी भूकंपाच्या वेळी केलेले आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्यासह लातूरच्या कायमच स्मरणात राहील असेच आहे.

हेही वाचा :  बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

आता कोरोनामुळे ओढवलेल्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व पोलिसांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सहाशे लिटर सॅनिटायझर पाठवले आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहे. सॅनिटायझरचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयात उतरविण्यात आला. त्यावेळी स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप मुंडे, डॉ. सूरज मोटे यांची उपस्थिती होती. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बारामती ॲग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी हे सहाशे लिटर सॅनिटायझर देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे सूरज मोटे यांनी दिली. या कंपनीकडून अनेक जिल्ह्यांमध्ये ही मदत देण्यात येत असून आपल्या जिल्ह्याला त्यांनी प्राधान्याने ही मदत दिल्याचे डॉ. मोटे यांनी सांगितले.

loading image