esakal | कोरोना सहाय्यता कक्षातील शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न

बोलून बातमी शोधा

File photo

कक्षातील शिक्षकांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, ओळखपत्र व विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने केली आहे.

कोरोना सहाय्यता कक्षातील शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना सहाय्यता कक्षामध्ये नेमणूक केलेल्या शिक्षकांना सुरक्षेविषयक कोणतीही साधने देण्यात आली नाहीत. मास्क, सॅनिटायझर या बाबीही त्यांना दिलेल्या नाहीत. या शिक्षकांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, ओळखपत्र व विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेने केली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कोरोना सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. हा कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे २४ तासांत प्रत्येकी आठ तास याप्रमाणे तीन शिक्षकांना तेथे काम करावे लागते. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची रजिस्टरला नोंद घेणे, या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवणे, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गावात फिरून जनजागृती करणे आदी कामे या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून बाहेर फिरण्याचे आवाहन केले जाते. मात्र या कक्षामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. सॅनिटायझरही या कक्षामध्ये उपलब्ध नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. पुणे, मुंबई या कोरोना बाधित परिसरातून आलेल्या नागरिकांची नोंद या कक्षामध्ये घ्यावी लागते. अशा व्यक्ती किमान १४ दिवस घरामध्ये राहाव्यात, त्या समाजात मिसळू नयेत, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही या कक्षातील कर्मचाऱ्यांवर आहे. या कक्षामध्ये सरपंच, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस, सेविका आदींचाही समावेश आहे. यापैकी आशा कार्यकर्ती वगळता अन्य कर्मचाऱ्यांना कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण दिलेले नाही.

या कक्षात कार्यरत शिक्षकांना मास्क, सॅनिटायझर आदी सुविधा द्याव्यात, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. ३०) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, कोरोना सहाय्यता कक्षात बाधित परिसरातून येणाऱ्या किंवा क्वारंटाइन व्यक्ती संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे त्यांना या स्तरावर कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण दिलेले नाही.

दिवसरात्र शिक्षक या कामी पोलिस, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कार्यरत असताना याच कक्षातील आशा कार्यकर्ती व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण आहे. परंतु याच सेवेत अंतर्भूत करूनही शिक्षकांना कोणतीही वैद्यकीय दक्षता व सुरक्षाविषयक साधने देण्यात आली नाहीत.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

राष्ट्रीय आपत्तीचे हे काम असल्याने शिक्षक जीव धोक्यात घालून हे काम करीत आहेत. त्यामुळे या कक्षात कार्यरत शिक्षकांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सॅनिटायझर, हँडग्लोज, मास्क, ओळखपत्र व विमा संरक्षण द्यावे. या निवेदनावर समितीचे प्रदेश उपाध्यक्ष कल्याण बेताळे, नेते बशीर तांबोळी, जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

कोरोना सहायता कक्षामध्ये सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला शिक्षकांना यामधून वगळून त्यांच्याऐवजी खासगी शिक्षकांची नेमणूक करावी. कक्षात कार्यरत शिक्षकांना मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर ही सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत. 
- कल्याण बेताळे, प्रदेश उपाध्यक्ष, राज्य प्राथमिक शिक्षक समिती