चौदाशे वर्षांपासूनची परंपरा झाली खंडित

सुनील पाटील
गुरुवार, 26 मार्च 2020

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महादेवाची यात्रा स्थगित करण्यात आल्यामुळे गेल्या चौदाशे वर्षांपासूनची परंपरा यंदा स्थगित करण्यात आली असल्याचे धजकरी विलास ढवण यांनी सांगितले.

खामसवाडी (जि. उस्मानाबाद) : खामसवाडी येथून भाविक दरवर्षी चैत्र महिन्यात सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या यात्रेस मानाची धज घेऊन जातात. गेल्या चौदाशे वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे असल्याचे जाणकार सांगतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महादेवाची यात्रा स्थगित करण्यात आल्यामुळे गेल्या चौदाशे वर्षांपासूनची परंपरा यंदा स्थगित करण्यात आली असल्याचे धजकरी विलास ढवण यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दरवर्षी चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूर येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. यंदा २५ मार्च ते सहा एप्रिलदरम्यान ही यात्रा भरणार होती. या यात्रेसाठी खामसवाडी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील धजीला मोठा मान आहे. शंकरपार्वतीच्या लग्नसोहळ्यात माहेरचा आहेर म्हणून मानाचे पागोटे खामसवाडीच्या धजीचे बांधले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी खामसवाडी गावात ही मानाची धज गावातून भक्तिभावाने शेकडो भाविकांसह धजकरी विलास ढवण हे पायी शिखर शिंगणापूरला डोक्यावर धज घेऊन जातात.

हजारो भाविक खामसवाडी परिसरातून जात असतात. चौदाशे वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याचे श्री. ढवण यांनी सांगितले. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या भीतीमुळे संसर्ग टाळण्यासाठी शिंगणापूरची यात्रा रद्द झाल्यामुळे खामसवाडीतून जाणारी मानाची धज शिंगणापूरला गेलेली नाही. गुडीपाडवा व दुसऱ्या दिवशी या धजीची गावात मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीवर तसेच भाविकांच्या व ग्रामस्थांच्या उत्साहावर कोरोनामुळे विरजण पडले आहे.

धजकरी विलास ढवण हे दोन महिने मोठ्या कष्टाने हातावर सूत कातून हे ३६५ फूट लांब मानाचे पागोटे (धज) महादेवाला आहेर म्हणून बनवतात. ढवण कुटुंबीय यात्रा काळात आठ दिवस डोक्यावर धज घेऊन खामसवाडी ते शिखर शिंगणापूरला पायी जातात. वाटेत त्यांना भाविकांच्या ओवाळणीतून १० ते १५ हजार रुपये मिळत असतात, असे ढवण यांनी सांगितले. ही धज शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे मंदिर ते जवळच असलेल्या बळीच्या मंदिराच्या शिखरांना बांधली जाते.
........


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad The tradition has been broken for fourteen hundred years