esakal | छोट्याशा वाडीवडगावातून हजारोंची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

वाडीवडगाव (ता. लोहारा) : जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले ट्विट.

आपला खारीचा वाटा उचलत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३२ हजार रुपये देणाऱ्या वाडीवडगावातील (ता. लोहारा) नागरिकांचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ट्विट करून कौतुक केले.

छोट्याशा वाडीवडगावातून हजारोंची मदत

sakal_logo
By
सुधीर कोरे

जेवळी (जि. उस्मानाबाद) : सुमारे बाराशे लोकसंख्या असलेल्या वाडीवडगावातील (ता. लोहारा) नागरिकांनी कोरोना संसर्गापासून बचावासाठी विविध उपाययोजना राबविण्याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३२ हजार रुपये दिले आहेत. आपला खारीचा वाटा उचलत मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ट्विट करून कौतुक केले.

जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेले वाडीवडगाव पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. शासनाचे तंटामुक्त गाव अभियान असो वा ग्रामस्वच्छता अभियान या गावचा यशस्वी सहभाग असतो. आता कोरोना लढ्यातही गावचा सक्रिय सहभाग दिसून येतो. येथील ग्रामपंचायत प्रशासन अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील नागरिक कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत.

प्रशासनाच्या आदेशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून प्रथमतः कोरोना सहायता कक्ष स्थापन करण्यात आला. येथे दररोज सकाळ व सायंकाळी दवंडीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पुणे, मुंबई आदींसारख्या बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून नोंदी ठेवल्या जात आहेत. तसेच दररोज या व्यक्तींच्या घरी जाऊन आरोग्याविषयी विचारपूस केली जात आहे.

पुणे, मुंबई शहरातून सुमारे दोनशे लोक गावाकडे परतले असून, या शहरातून आलेल्यांच्या हातावर होम क्वारंटाइन शिक्के मारून विलगीकरणासाठी १४ दिवस शेतात राहण्यास सांगितले जात आहे. तसेच गावात भाजीपाला, तांदूळ वाटप करताना सुरक्षित अंतर ठेवले जात आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील संपूर्ण तीनशे कुटुंबांना हॅन्डवॉश, सॅनिटायझर, साबण व प्रत्येकासाठी मास्क वाटप करण्यात आले आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात आपलीही छोटीशी मदत म्हणून येथील नागरिकांना लोकवाटा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद देत नागरिकांनी ३२ हजारांचा लोकवाटा जमा केला आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणाऱ्या गावकऱ्यांचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ट्विट करून आभार मानत गावचे कौतुक केले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

यासाठी सरपंच वनमाला अंकुश भुजबळ, उपसरपंच आशाबी शेख, पोलिस पाटील सहदेव गिराम, माजी सरपंच हरिदास गिराम, दयानंद पाटील, दयानंद भुजबळ, आप्‍पाशा भुजबळ, सदस्य अंबूबाई गाडेकर, बालाजी लकडे, हणमंत गाडेकर, अंगद गिराम, अविनाश गिराम, महादेव बेळे, ग्रामसेवक कदम, दगडू गिराम, सोमनाथ भुजबळ, दीपक गिराम, लोचना भुजबळ, सुप्रिया गिराम आदींचे सहकार्य लाभले.