esakal | कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सर्वधर्मियांचे ग्रामदैवताला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

केसरजवळगातील सर्वधर्मियांनी शनिवारी एक दिवस उपवास करीत सायंकाळी दिवे लावून देशाला कोरोनामुक्त करण्याचे साकडे ग्रामदैवत हनुमानाला घातले.

कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सर्वधर्मियांचे ग्रामदैवताला साकडे

sakal_logo
By
जावेद इनामदार

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण देशातही दिवसेंदिवस वाढत आहे. आपण, आपले स्वकीय अन्‌ गावकरी कोरोनाला बळी पडू नये यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे प्रत्येक जण काटेकोरपणे पालन करीत आहेत. केसरजवळगातील सर्वधर्मियांनी शनिवारी (ता. दोन) एक दिवस उपवास करुन सायंकाळी दिवे लावून आपले गाव अन्‌ देशावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे ग्रामदैवत हनुमानाला घातले.

उस्मानालगतच्या सोलापूर, लातूर, गुलबर्गा व बिदर (कर्नाटक) या चारही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सुरवातीला चीनच्या वुहानमध्ये आढळलेला कोरोना आता आपल्या जिल्हयाच्या सीमेवर पोचल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. बहुतांश नागरिक सतर्क झाले असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

गावच्या सीमा सील करीत गावकऱ्यांनी रस्ताच अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदला आहे. मात्र तरीही कधीही अन्‌ कोणत्याही मार्गाने कोरोनाचा गावात शिरकाव होईल, याचा नेम नाही. सध्या उस्मानालगतचे सोलापूर, बिदर व गुलबर्गा हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सोलापूर व गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर असून, छुपे मार्गही अनेक आहेत.

जिल्ह्याच्या सीमा सहजपणे छुप्या मार्गाने नागरिक पार करु शकतात. त्यामुळे गाव परिसरात केव्हाही कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो, अशी भीती केसरजवळगाकरांना भेडसावत आहे. गावापासून अवघ्या २० किलोमीटरवर आळंदची (कर्नाटक) मोठी बाजारपेठ आहे. या गावाला जाण्यासाठी चार रस्ते असून दोन मुख्य व दोन कच्चे रस्ते आहे.

आळंदमध्ये दोन रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरु आहेत. तेथुन गुलबर्गा ४० किलोमीटरवर आहे. हे शहर हॉटस्पॉट असल्याने सीमावर्ती भागातील गावांना कोरोनाचा धोका अधिक आहे. याच भीतीने गावातील सर्वधर्मिय नागरिकांनी शनिवारी एक दिवसाचा उपवास करुन सायंकाळी दिवे लावून ग्रामदैवत हनुमानाला कोरोनापासून संरक्षणासाठी प्रार्थना केली. यासाठी मंदिर समिती व मस्जिदकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाच प्रतिसाद देत ग्रामस्थांनी उपवास करुन घरातच दिवे लावून ग्रामदैवतांला देशाला कोरोनामुक्त करा, असे साकडे घातले. 

loading image