Success Story : कोथिंबीर विकणारा खेळतोय लाखांत, स्टार्टअपच्या दुनियेत उस्मानाबादच्या सुरज शिंदेची भरारी

तानाजी जाधवर
Thursday, 19 November 2020

उस्मानाबादचा तरुण सुरज शिंदे. त्याने नवीन स्टार्ट अप सुरु केले आहे. त्यातून तो लाखो रुपये कमावत आहे.

उस्मानाबाद : सध्याचे युगामध्ये नवीन कल्पना व त्याला मूर्त स्वरुप देणाऱ्या व्यक्तीला प्रचंड मागणी आहे. त्यातही तंत्रज्ञान अवगत असल्यास त्याला जगात काहीच कमी पडत नाही. त्याचाच प्रत्यय उस्मानाबादच्या सुरज शिंदेला आला आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याला एक सन्मानाचा मार्ग सापडला असुन नुसता सन्मानच नाही तर पैसाही कमावत आहे. तेरणा महाविद्यालयामध्ये बीसीएचे शिक्षण घेतल्यानंतर आजच्या युगात काय हवय याचा अभ्यास केला. तेव्हा त्याने नव-नवीन अॅप्लिकेशन्स बनविण्यास सुरुवात केली. एवढचे नव्हे तर पहिल्यांदा महाविद्यालयासाठी व नंतर विद्यापीठासाठी कॅम्पस अॅप्लिकेशन बनवून दिले.

आज सुरजच्याच अॅप्लिकेशनचा उपयोग येथे शिक्षण घेणारे करत असल्याचे समाधान त्याला आहे. पण हे करताना त्यामध्ये नावीन्य दिसत नसल्याची गोष्ट त्याला अस्वस्थ करु लागली. शिवाय यासाठी कुणीतरी पैसे गुंतविणाऱ्याची आवश्यकता होती. कमी वयामध्ये अशा माहीत नसलेल्या क्षेत्रासाठी पैसे गुंतविण्याचा धोका कोणीच पत्करला नाही. त्यामुळे त्याने पैसे कमविण्यासाठी वाट्टेल ते काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदा प्लंबिगपासून त्याने काम सुरु केले. एमआयडीसीमधील कारखाने, साखर कारखाने अशा ठिकाणी त्याने बरीच वर्षे काम केले.

तुळजापूरला रोज चार हजार भाविकांना दर्शनाची संधी, एक हजार जणांसाठी सशुल्क व्यवस्था

त्यातून त्याने एक लॅपटॉप खरेदी केला व पुन्हा प्रोग्रॅमिंगमध्ये लक्ष घातले. त्यातून त्याला अनेक काम मिळायला सुरुवात झाली. हे काम सुरु असताना त्याने भाजी विकण्याचा व्यवसाय सुरु केला. भाजी विकताना मार्केटचा अंदाज आला शिवाय नवतंत्रज्ञानाच्या मदतीने याची वेगळी कल्पना त्याने मांडली. होम डिलिव्हरीसाठीचे ordor.in नावाचे अॅप्लिकेशन त्याने सुरु केले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. उस्मानाबादसह इतर मोठ्या चार ते पाच शहरांमध्ये ही साखळी यशस्वी ठरली. त्यातुन महिन्याकाठी चांगले पैसेही मिळु लागले होते.

जवळपास दहा ते बारा लोकांचा स्टाफ व कार्यालये अशी मोठी यंत्रणा उभी राहिली होती. मात्र तिथेही नव्या व मोठ्या कंपन्या आल्याने त्यानी दिलेल्या ऑफर्समुळे ही यंत्रणा काहीशी मागे पडत होती. त्यामुळे सुरजने पुढचा विचार करुन ही सर्व यंत्रणा पंढरपुरच्या एका व्यावसायिकाला विकुन टाकली. त्यातुन त्याला साडेपाच लाख रुपय मिळाले. हे अॅप्लिकेशन अजुनही अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरु असून त्याला पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यीनचे व्यासपीठ
सकाळच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कने (यीन) खुप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला होता. योग्यवेळी त्या माध्यमातुन मला जगात काय सुरु आहे, याची माहिती मिळाली. म्हणुनच मी हे करु शकलो, कोणत्याही यशासाठी पहिले पाऊल टाकणे महत्त्वाचे आहे. अगदी ते पाऊल टाकण्यासाठी मला यीनच्या व्यासपीठाचा उपयोग झाला असल्याची प्रतिक्रिया सुरज शिंदे यांनी दिली.

 

ज्या भाजी मार्केटचा त्याने अभ्यास केला होता. त्याच धर्तीवर मोठ्या व्यावसायिकाने सुरजला २७ लाख रुपयांची गुंतवणुक करुन नवीन स्टार्ट-अपची कल्पना मागवून घेतली. त्याचे काम आता संपले असुन लवकरच हे स्टार्टअप मुंबईमध्ये सुरु होणार आहे. अत्यंत छोट्या गावातुन येत मुंबईसारख्या शहरामध्ये हा नवा प्रयत्न साकरताना समाधान मिळत आहे.
- सुरज शिंदे, स्टार्ट-अप उद्योमी   

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad's Suraj Shinde Starts New Starts Up, He Earns Lakh Of Rupees