औंढा नागनाथ मंदिर ३१ मार्चपर्यंत दर्शनांसाठी बंद

aundha nagnath
aundha nagnath

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : देशातील आठवे ज्योतिर्लिंग  असलेल्या येथील श्री नागनाथाचे दर्शन मंगळवारी रात्रीपासून (ता. १७) भाविकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार तथा मंदिर समितीचे अध्यक्ष पांडुरंग माचेवाड यांनी दिले आहेत. मात्र, नित्य पूजा, कार्यालयीन कामकाज व स्वच्छता सुरू राहणार असून कोरोनाच्या खबरदारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळून येत आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. औंढा नागनाथ देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. परंतु, कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी येथे गर्दी होणार नाही, यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. 

मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर सूचना फलक

तसा निर्णय विश्वस्त समितीला विचारात घेऊन संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी घेतला आहे. दरम्यान, मंदिरात पहाटे स्नान, दुपारी बारा वाजता असणारी महानैवेद्य आरती, तसेच दुपारी चार वाजता महादेवाला स्नान व रात्री आठच्या नंतरची शेजआरती, अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. यात केवळ संस्थानमधील पुजाऱ्यांचा समावेश असणार आहे. ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. तसा फलक मध्यरात्री मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश 

हिंगोली : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी शासनाने तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंतुलेनगर, गिरगाव, कुरुंदा, वारंगा फाटा, आखाडा बाळापूर येथील आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

कोरोना विषाणूंचस प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, मॉल, जिम त्‍याच प्रमाणे आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, एकाच ठिकाणी जमाव करू नये, सर्वांनी सावधानता बाळगावी, खोकला, ताप, सर्दी येत असल्याची लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोरोना आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

पुढील आदेश येईपर्यत बंद

 त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, आठवडे बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बळसोंड ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या व शहरालगत असलेल्या अंतुलेनगर येथे रविवारी भरणारा आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी श्री. जयवंशी यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे गिरगाव (ता. वसमत) येथील बुधवारी (ता.१८) भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे सरपंच मारोतराव कुंभारकर यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

 गिरगाव येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरविण्यात येतो. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंधरा दिवस आठवडे बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. त्‍यामुळे बुधवारी भरविण्यात येणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे सरपंच श्री. कुंभारकर, उपसरपंच सुधाताई कऱ्हाळे यांनी सांगितले आहे. तसेच कुरुंदा येथे शनिवारी (ता.२१) व (ता.२८) भरणारा आठवडे बाजारही बंद राहणार असल्याची माहिती सरपंच डॉ. प्रीतीताई दळवी यांनी सांगितले.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com