आमचे घर पाण्यात गेले हो, गोकुळबाईंनी मांडली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत

जगदीश कुलकर्णी
Tuesday, 20 October 2020

आमचे घर पाण्यात गेले हो अशा शब्दात गोकुळबाई अरूण गिरी या अपसिंगा (ता.तुळजापूर) येथील वेशीच्या बाहेर राहणाऱ्या महिलेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : आमचे घर पाण्यात गेले हो अशा शब्दात गोकुळबाई अरूण गिरी या अपसिंगा (ता.तुळजापूर) येथील वेशीच्या बाहेर राहणाऱ्या महिलेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत मांडली. मंगळवारी (ता.२०) कामठा (ता.तुळजापूर) येथून तुळजापूर शहराकडे येताना श्री.फडणवीस हे अपसिंगा येथे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले होते. गोकुळबाई अरूण गिरी या महिलेने सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अतिवृष्टीने नुकसान झाल्याची कैफियत मांडली.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती; मदतीसाठी सरकारला भाग पाडू, देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

श्री फडणवीस यांच्या कारचे सारथ्य आमदार राणाजगजितसिंह पाटील हे करीत होते. श्री फडणवीस हे गाडीतुन उतरल्यानंतर अपसिंगा येथील विहिरीजवळ उतरले. त्यानंतर लवाजम्यासह पुढे गेले. त्यानंतर परत फिरून गोकुळबई गिरी या महिलेच्या घरापर्यंत गेले. यावेळी गोकुळबाई म्हणाल्या की, माझ्या तीन मुलांची घरे पाण्यात गेली आहेत. आम्हाला उदरनिर्वाहाचे साधने नाहीत. घरामध्ये तीन-तीन लहान लेकरे आहेत. आमचे झालेले नुकसान भयावह आहे.

आमच्याकडे उदरनिर्वाहाचा कोणताही मार्ग नाही. यावेळी मीराबाई पुरी यासह अन्य ही महिलांनी श्री फडणवीस यांना अतिवृष्टीची माहिती सांगितली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, अपसिंगा येथील सरपंच शंकर गोरे आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते यांचा दौरा कामठा येथे झाला. कात्री येथील हद्दीवरून श्री फडणवीस अपसिंगा येथे गेले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our House Drowned, Gokulabai Express Her Pain To Fadanvis