शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती; मदतीसाठी सरकारला भाग पाडू, देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

जलील पठाण
Tuesday, 20 October 2020

अतिवृष्टीने झालेलं नुकसान भयंकर असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

औसा (जि.लातूर) : मी मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी केलेलं वक्तव्य जरी सद्यःस्थितीत पूर्ण केले तरी भरपूर आहे. अतिवृष्टीने झालेलं नुकसान भयंकर असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि उरात भीती आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे आश्‍वासन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर साधला निशाना

मंगळवारी (ता.२०) औसा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केल्यावर ते आशिव, शिवली मोड आणि बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांच्या सोबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह आजी माजी खासदार, आमदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री.फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करतांना सांगितले की, माझ्या सरकारच्या काळात पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीने नुकसान झाल्यावर हेच उद्धव ठाकरे आणि अजित पवार शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार तर फळबागायतीसाठी दीड लाख रुपये सरकारने देण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार आहे. त्यांनी किमान आमच्याकडे केलेली मागणी तरी पूर्ण करावी असा टोला लगावला. तत्कालीन सरकारने दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्याला दिल्याची आठवण करून या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी आणि ती देण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू.

सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची टीका

येथील शेतमालासह जमीन खरवडून गेली आहे. विजेचे खांब उखडले आहेत तर अनेक घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या लागत असलेल्या जमिनी वाहून गेल्याने नुकसान झाले आहे आणि महामार्गाच्या गेलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. या बाबतही आम्ही पाठपुरावा करू असे आश्‍वासन ही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Are Fear, But We Pressurize Government For Assistance, Said Fadanvis