जालना : लॉकडाउन काळातही परजिल्ह्यातून आले एक लाख नागरिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

  • कोरोनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त 
  • लॉकडाउनमध्येही आजाराचा प्रसार 

जालना - कोरोनाला आळा घालण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी जिवापोटी, तर अनेकांवर रोजगारापोटी वर्षानुवर्षे राहत असलेल्या शहरातून गावी परतण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात आतापर्यंत ९९ हजार ७४० नागरिक इतर जिल्ह्यांतून एकट्या जालना जिल्ह्यात दाखल झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दरबारी झाली आहे. दुसरी प्रशासनाला माहिती न देता अनधिकृत जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. परिणामी, कोरोनाचा प्रसारही वाढू लागला आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या; मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी शासनानेच स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना परवाने दिले. त्याचा परिणाम म्हणजे लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याची सीमा बंद असताना आजघडीला लाखो नागरिक इतर जिल्ह्यांतून जालना जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

जिल्हा नियंत्रण कक्षाच्या आकडेवारीनुसार ९९ हजार ७४० नागरिक इतर जिल्ह्यांतून जालना जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक भोकरदन तालुक्यात १५ हजार २२८ नागरिक इतर जिल्ह्यांतून दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ मंठा तालुक्यात १३ हजार ७७५, अंबड तालुक्यात १३ हजार ७२५, घनसावंगी तालुक्यात १३ हजार ३६७, जालना शहरात १२ हजार ८६७, जालना तालुक्यात १० हजार ३६७, परतूर तालुक्यात आठ हजार २६७, बदनापूर तालुक्यात सात हजार ९६६, तर जाफराबाद तालुक्यात
सहा हजार १०२ नागरिक इतर जिल्ह्यांतून दाखल झाले आहेत. 

लॉकडाउनच्या काळात कंपन्यांसह दुकाने बंद राहिल्याने खासगी नोकरदार व मजूर आर्थिक संकटात आल्याने गावी परतले आहेत. अनेकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गावाची वाट धरली. त्यामुळे या कोरोनाने लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले असून, बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे, हे वास्तव शासनाने डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करणे
अपेक्षित आहे. 
  
विळखा वाढू लागला 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. लॉकडाउन जर कोरोना रोखण्यासाठी होते तर लॉकडाउनमध्ये कोरोनाचा प्रसार कसा झाला? असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे; परंतु याचे मूळ कारण म्हणजे लॉकडाउनमध्ये शासनानेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा परवाना दिला. त्यामुळे कोरोनाचा
अधिक विळखा असलेल्या शहरातून परतलेल्या नागरिकांमुळे सर्वत्र कोरोनाचा प्रसार होण्यास सुरवात झाली; मात्र हे वास्तव शासन स्वीकारण्यास तयार नाही. 
  
...तर कोरोनाही आटोक्यात आला असता 
शासनाने मोठ्या शहरातून होणारे स्थलांतर रोखले असते, तर ज्या भागात कोरोनाचा शिरकाव नव्हता तो भाग सुरक्षित राहिला असता; मात्र लॉकडाउनमुळे रोजगार गेल्यानंतर आर्थिक संकट निर्माण झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले. त्यामुळे लाखो लोक महानगरं सोडून गावी परतले आहेत. परिणामी, शासनाला स्थलांतर रोखता आले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसारही रोखणे शक्य झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 1 lakh migrants to return to Jalna