कोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षा देणार

विकास गाढवे
Saturday, 12 September 2020

कोरोनाच्या कचाट्यात देशभरात पहिल्यांदाच रविवारी (ता.१३) होत असलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेकडे (नीट) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परीक्षा देणाऱ्यांसह ती घेणाऱ्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत यंत्रणेची कसरत होणार असली तरी त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लातूर : कोरोनाच्या कचाट्यात देशभरात पहिल्यांदाच रविवारी (ता.१३) होत असलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेकडे (नीट) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परीक्षा देणाऱ्यांसह ती घेणाऱ्यांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत यंत्रणेची कसरत होणार असली तरी त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४३ केंद्रांवर ही परीक्षा होत असून १६ हजार ८८४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. लातूर शहरात सर्वाधिक ३८ परीक्षा केंद्रे असून औसा तालुक्यात तीन तर अहमदपूर व उदगीर येथे प्रत्येकी एक केंद्र आहे.

लातूरात पोलिसांच्या बदल्या ! मुख्यालयात ठाण मांडून बसलेले ८१ जण ठाण्यात ! 

ही परीक्षा विनातक्रार व विनाअडथळा पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. यात परीक्षा केंद्रांवरील कायदा व सुव्यस्थेसाठी कलम १४४ लागू करण्यात आले असून परीक्षेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशिवाय केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सोबत सर्व केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा अतिसंवेदनशील परीक्षेच्‍या दिवशी व कालावधीत वीजपुरवठा खंडीत न करण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महावितरणला दिले आहेत.

यासोबत विद्यार्थ्‍यांची प्रवासासाठी गैरसोय होऊ नये म्हणून नियमित बसगाड्याही सुरू ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाला देण्यात आली आहे. एकुण ४३ परीक्षा केंद्रापैकी वीस केंद्रांसाठी समन्‍वयक म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य भारत भूषण (मोबाईल क्रमांक ७५०६२८०३६६), तर उर्वरीत २३ परीक्षा केंद्रांचे समन्‍वयक म्‍हणून जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रमेश राव (मोबाईल क्रमांक ८६००५८९५९७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत सर्व केंद्रावर समन्वयासाठी स्वतंत्र प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून त्यात केंद्र असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्य व प्रमुख शिक्षकांचा समावेश आहे.

प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प, जालना पॅटर्न सर्वत्र राबविणार,...

परीक्षा केंद्रांवर जय्यत व्यवस्था
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. कोरोनापासून बचावासाठी सर्व केंद्रावर सुरक्षा उपाययोजनांची कार्यप्रणाली तयार करण्‍यात आली असून त्‍यानुसार परीक्षा केंद्रावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर स्‍वतंत्र नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात असून त्यात केंद्रप्रमुख व निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी अकरापासूनच वेळापत्रकानुसार केंद्रात प्रवेश दिला जाणार असून ही प्रक्रिया दुपारी दीडपर्यंत सुरू राहणार आहे. एका वर्गात केवळ बारा विद्यार्थ्यांना बसण्‍याची व्यवस्था करण्यात आली असून त्‍यांना सॅनिटायझर, मास्‍क आदी साधनेही पुरवठा करण्यात येणार आहेत. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनींग करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी हे करावे
विद्यार्थ्‍यांनी राष्‍ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) च्‍या संकेतस्‍थळावरुन डाऊनलोड केलेल्‍या अर्जासह व योग्‍य पद्धतीने भरलेले प्रवेशपत्र, स्वतःची पारदर्शक पाण्‍याची बाटली, हजेरी पत्रकावर लावण्‍यासाठी अर्जावर अपलोड केल्‍याप्रमाणे स्वतंत्र (अतिरिक्त) छायाचित्र, स्वतःचे सॅनिटायजर, मास्‍क आणि हातमोजे तसेच ओळखीचा पुरावा म्‍हणून फोटोसह पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्‍स, मतदान ओळखपत्र, बारावी प्रवेश किंवा नोंदणी कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ई - आधार व आदी पुरावा सोबत ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 43 Exam Centres Students Will Give NEET Latur News