
महिलांना कामगार कल्याण मंडळाच्या शिवणकाम व खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रशिक्षणाने आधार दिला आहे. गेल्या पाच वर्षात गट कार्यालयांतर्गत येणाऱ्या १४ केंद्रांतून सुमारे दोन हजार १०० महिला शिवणकाम व खाद्यपदार्थ प्रशिक्षणाद्वारे उद्योगिनी बनल्या आहेत.
नांदेड : पती कामावर गेले, मुले शाळेत गेली की दिवसभर घरी काय करायचे? दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील कार्यक्रम किती पाहणार, पुस्तके किती वाचणार, वेळ जात नाही? अशी महिलांची स्थिती असते. अशा वेळी त्या हवालदिल होतात. मात्र, अशा महिलांना कामगार कल्याण मंडळाच्या शिवणकाम व खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रशिक्षणाने आधार दिला आहे. गेल्या पाच वर्षात गट कार्यालयांतर्गत येणाऱ्या १४ केंद्रांतून सुमारे दोन हजार १०० महिला शिवणकाम व खाद्यपदार्थ प्रशिक्षणाद्वारे उद्योगिनी बनल्या आहेत.
असे दिले जाते प्रशिक्षण
कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महिला सक्षमीकरणास बळ देणारे शिवणकाम व खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यात विविध निमशासकीय कार्यालयातील खासगी कंपन्या, दुकाने, व्यवसाय-उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील महिला व युवतींना प्रशिक्षण दिले जाते. अशा पारंपरिक कामाच्या प्रशिक्षणाचा काय उपयोग, असा नाराजीचा सूर सुरवातीला जरूर आळवला गेला. मात्र, शिवणकाम अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या पहिल्या कामगार महिलांना शिवणयंत्रे मोफत दिली गेली. त्यातून प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली. पाच वर्षात ७० पेक्षा अधिकाधिक शिवणयंत्रे दिली गेली. नांदेडसह परभणी व हिंगोली शहरात १४ प्रशिक्षण केंद्रांत प्रत्येकी ३० महिलांच्या एका बॅचला प्रशिक्षण देण्यात येते.
हेही वाचा - ‘या’ तालुक्यात रक्तदात्यांचा कौतुकास्पद उपक्रम
शिष्यवृत्तीचाही मिळतो लाभ
गेल्या पाच वर्षांत जवळपास दोन हजार १०० महिलांनी शिवणकामचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी बहुसंख्य महिला शिवणकाम व खाद्यपदार्थ बनविण्याचा स्वतंत्र व्यवसाय करतात. घरबसल्या हा व्यवसाय सुरु केला आहे. अवघ्या चार-पाच तासांत शिवणकाम करून घरबसल्या महिन्याकाठी तीन ते दहा हजार रुपयांपर्यंतची कमाई सुरु झाली. तर काही महिला कापड दुकान, गारमेंटमध्ये नोकरी करीत आहेत. काही महिला, युवतींनी खंडित झालेले शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. अशा महिलांनाही कामगार कल्याणच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे.
हे देखील वाचलेच पाहिजे - टेम्पो चालक संघटनेने शासनाकडे केली ही मागणी...
इतरही प्रशिक्षण दिले जाते
शिवणकाम घरबसल्या रोजगाराची संधी देणारा व्यवसाय आहे. अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षितांनाही शिवणकाम प्रशिक्षण घेता येते. यातून नव्या काळाशी सुसंगत असे फॅशनेबल कपडे शिवण्याचे कौशल्य महिला व युवतींना मिळाले आहे. याद्वारे शाश्वत रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली. शिवाय हस्तकला, सौंदर्य, मसाले, कुकिंगचेही प्रशिक्षण केंद्रातर्फे वेळोवेळी दिले जाते.