esakal | हिंगोलीत ऑक्सीजन टँक झाला उपलब्ध; कोरोना बाधीतांना दिलासा

बोलून बातमी शोधा

हिंगोली आॅक्सीजन
हिंगोलीत ऑक्सीजन टँक झाला उपलब्ध; कोरोना बाधीतांना दिलासा
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीने बाहेर राज्यात संपर्क साधून एक ऑक्सिजन टँकर कर्नाटकामधून उपलब्ध केला आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी हा टँकर उपलब्ध झाल्याने ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांना व त्याच्या नातेवाईकाना दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात शासकिय रुग्णालयांमधून ३४० रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. रुग्णांना ऑक्सींजनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोलीत दोन तर वसमत व कळमनुरी येथेही ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आले आहे. हिंगोलीत तीन केएल ऑक्सीजन दररोज लागले तर या ठिकाणी असलेल्या टॅंकची क्षमता १३ केएलची आहे. मात्र मागील तीन दिवसांपुर्वी आलेले ऑक्सीजन गुरुवारी सकाळपर्यंतच पुरणार आहे. तर कळमनुरी व हिंगोलीतील औंढा रोड भागातील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सीजन साठा आहे.

हेही वाचा - वसमत शहरातील मटका बुक्कीवर कारवाई; ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात सायंकाळपासूनच वैद्यकिय अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली होती. या ठिकाणी चार ड्युरा सिलेंडर असून ऑक्सीजन टँकमधील ऑक्सीजन गुरुवारी सकाळी संपल्यानंतर ड्यूरा सिलेंडरमधून बॅकअप घेण्याची तयारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे यांनी सुरु केली होती. तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी राज्यासोबतच बाहेर राज्यातही ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याबाबत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी उशिरा कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथुन ऑक्सीजन टँकर उपलब्ध करुन देण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर या ठिकाणावरुन रातोरात टँकर मागवण्यात आले. सकाळीच तीन केएल क्षमतेचे टँकर हिंगोलीत पोहोचले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आॅक्सीजनवरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे