पुन्हा उफाळला वाद : साई जन्मस्थळाचे नामांतर करा...

गणेश पांडे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

शिर्डीची ओळख साईबाबांची शिर्डी अशी झालेली आहे. आपल्या पाथरीची ओळखही साईबाबांची पाथरी, अशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाथरी शहराचे नामकरणच ‘साई धाम’ करण्याची मागणी आमदार बोर्डीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना व्दारे केली आहे. तसेच पाथरी जन्मभूमी दावा मजबूत करण्यासाठी पुढे येण्याचे आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी आवाहन केले आहे.

परभणी : साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याचे कागदोपत्री सिद्ध आहेच. आपला हा दावा अधिक प्रभावी करण्यासाठी पाथरी शहराचे नाव बदलून ते साईधाम असे करावे, अशी मागणी आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह स्थानिक प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असून जिल्ह्यातील प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

श्री साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी विरूद्ध पाथरी असा संघर्ष पेटलेला आहे. शिर्डीकरांनी जन्मस्थळाबाबतचा दावा फेटाळला असताना पाथरीसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या प्रकरणात एकवटले आहेत. आता जिंतूर- सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे.

हेही वाचा -‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

शिर्डीची ओळख साईबाबांची शिर्डी अशी झालेली आहे. आपल्या पाथरीची ओळखही साईबाबांची पाथरी, अशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाथरी शहराचे नामकरणच ‘साई धाम’ करण्याची मागणी आमदार बोर्डीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदना व्दारे केली आहे.

आमदार तथा विश्वस्त बाबाजानी दुर्राणी यांच्यासह पाथरी नगराध्यक्षांनाही त्यांनी नगर परिषदेत अशा प्रकारचा ठराव पारित करून तो शासनाकडे पाठवण्याबाबात सूचित केले आहे. आता पाथरी नगर परिषद प्रशासन बोर्डीकर यांच्या या मागणीस कसा प्रतिसाद देते, याकडे जिल्हाभरातील साई भक्तांचे लक्ष लागले आहे.

जसा शेगाव -पंढरपुर दिंडी मार्ग झाला तसाच साईबांबाच्या गुरुस्थान सेलु, जन्मभुमी पाथरी ते कर्मभुमी शिर्डी हा कॉरिडोअर विकसीत करावा, अशी मागणीही बोर्डीकर यांनी केली आहे.

गुरू स्थानाच्या विकाससाठी करणार मागणी

साई बाबांचे गुरु म्हणून मान्यता असलेल्या सेलू येथील केशवराज बाबा महाराज यांच्या मंदिरात लवकरच महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. तसेच मंदिर आणि सेलू शहराचा गुरूस्थान या अनुषंगाने जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहीती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pātharī Name Please 'Sai Ram'