‘स्पेशल’च्या नावाखाली ‘पॅसेंजर’ची सुविधा 

राजन मंगरूळकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

नांदेड - औरंगाबाद रेल्वे ठरतेय गैरसोयीची
 सचखंड करतेय परभणीच्या पुढे ‘ओव्हरटेक’

नांदेड ः नांदेड-औरंगाबाद नावाने स्पेशल रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा दिल्याचे रेल्वे प्रशासन भासवित असले तरी ही ‘स्पेशल’ रेल्वे टिकीट दर आणि जागोजागी क्रॉसिंगच्या नावाखाली थांबवून एखाद्या पॅसेंजर रेल्वेत प्रवासाला निघाल्याचा अनूभव प्रवाशांना देत आहे. गुरूवारी (ता.२३) नांदेड-औरंगाबाद रेल्वे सकाळी आठल्या नांदेडहून निघाल्यावर तिला परभणी येथे एक तास तर औरंगाबाद पोहचायला तब्बल अडीच तास उशिर झाला. विशेष म्हणजे, नांदेडहून सकाळी साडेनऊला निघालेल्या ‘सचखंड’ने या स्पेशल रेल्वेला राजंणी येथे ‘ओव्हरटेक’ केले. लवकर पोहचण्यासाठी निघालेले प्रवासीच उशिरा पोहचले, हे विशेष.

मागील चार महिन्यापासून नांदेड-औरंगाबाद-नांदेड ही रेल्वे रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी नांदेडवरून मराठवाडा आणि सचखंड रेल्वेच्या दरम्यान असलेल्या चार तासांच्या गॅपमध्ये नांदेड-औरंगाबाद ही रेल्वे सुरू झाल्याने अनेकांना अप-डाऊन आणि कामानिमित्त एकदिवसाकरिता औरंगाबाद जाण्यासाठी ही रेल्वे सोयीची वाटली. दर महिन्यात रेल्वेच्या फेऱ्याची मुदत वाढविली जाते. तशीच ती जानेवारीत वाढली आहे. 

प्रवाशांनी वाचला गैरसोयीचा पाढा 
सकाळी आठ वाजता नांदेडवरून निघणारी रेल्वे पुर्णा जाण्यास एक तास तर तेथून परभणीला एक तास ही रेल्वे लावत आहे. तिचा औरंगाबाद येथील निर्धारित वेळ १२.४० आहे, मात्र ती वेळेवर क्वचितच जात असल्याचे अनेक प्रवाशांनी बोलून दाखविले. गुरूवारी असाच अनूभव आल्याचे एक प्रवाशाने बोलून दाखविले. सकाळी नऊ ९.१० वाजता परभणीत येणारी रेल्वे १०.१५ ला आली. सचखंड परभणीत १०.३५ ला रोज येते, ती १०.१५ वाजता पूर्णा येथे असल्याचे पाहून या रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला, मात्र झाले उलटेच. नांदेड-औरंगाबाद रेल्वे परतूरच्या नंतर रांजणीजवळ थांबवून मागून येणाऱ्या सचखंडला पुढे सोडण्यात आले. परिणामी, नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वे दुपारी सव्वातीनला औरंगाबाद येथे पोहोचली.

हेही वाचा -  औरंगाबादमधून अशी पसरली मराठवाड्यात शिवसेना

इथे दररोज क्रॉसिंगसाठी अडथळा
लिंबगाव- परळी-आदिलाबाद, चुडावा- मुंबई-सिकंदराबाद देवगिरी, पुर्णा- पनवेल-नांदेड, पूणे-नांदेड (मंगळवार, गुरूवार) या ठिकाणावरील क्रॉसिंगमुळे एक तास वेळ जातो.

हेही वाचा -  चहाची क्रेझ वाढते अशी

पुर्णेत ट्रॅक मिळण्यास अडचण
सकाळी नांदेड येथून सातच्या दरम्यान दररोज हैदराबाद-परभणी (पुशपुल), पाटणा-पूर्णा (दोन दिवस), आणि काही विशेष रेल्वे आहेत, त्यावेळी पूर्णेत परभणीहून येणाऱ्या देवगिरी, पूणे सुपरफास्ट, पनवेल आणि इतर मालगाड्या यामुळे सकाळी बराच वेळ नांदेड-औरंगाबाद रेल्वे लिंबगाव, चुडावा, पुर्णा स्थानकाबाहेर आऊटरला उभी केली जाते. एक नंबर प्लॅटफॉर्मवर हैदराबाद-परभणी (पुशपुल) रेल्वे मिरखेलकडे जाईपर्यंत नांदेड - औरंगाबाद रेल्वे स्थानकात घेतली जात नाही. घेतल्यावर दहा ते पंधरा मिनिट फिलिंग आणि मग परभणीकडे जाते, हे नेहमीचेच आहे.

तिकीट ‘सचखंड’चे आणि प्रवास पॅसेंजरसारखा
नांदेड - औरंगाबाद रेल्वेचे परभणीचे तिकीट ५० रूपये एवढे आहे, जे की सचखंड सुपरफास्ट एवढे. पॅसेंजरचे तिकीट आता पाच रूपयांनी वाढल्याने ते आता परभणीपर्यंत २० तर तपोवन, मराठवाडा, नंदिग्राम आणि देवगिरी, अजंठाचे ३५ आणि सचखंड, पुणे सुपरफास्ट, हजरत निझामुद्दीन यांचे तिकीट ५० रूपये आहे, या तिन्ही रेल्वे सुपरफास्ट तिकीट घेतात मात्र, तसा कालावधी घेत किमान वेळेवर सोडतात तरी. नांदेड - औरंगाबाद मात्र स्पेशलच्या नावाखाली तिकीट आकारून प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भूर्दंड देणारी ठरत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger facility under the name of 'Special'