डॉ.शिवाचार्य महाराजांच्या निधनाने ६६ वर्षांची परंपरा असलेली चापोली ते कपिलधार महापदयात्रा पोरकी

Chapoli Kapildhaara Padyatra.jpeg
Chapoli Kapildhaara Padyatra.jpeg

चापोली (जि.लातूर) :  डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मंगळवारी (ता. एक) झालेल्या निधनाने ;चोपाली (ता.चाकूर) येथे हळहळ व्यक्त केली जात असून शिष्यगणांवर शोककळा पसरली आहे. महाराजांचे व चापोलीचे ६६ वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. ते चापोली ते कपिलधार यात्रेमुळे. मागील ६६ वर्षांपासून सुरू असलेली ही चापोली ते कपीलधार महापदयात्रा आता डॉ.शिवाचार्यांच्या निधनामुळे पोकळी झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. या महापदयात्रेच्या उगमस्थानाचा मान महाराजांनी चापोलीला दिला, याचाही ग्रामस्थांना मोठा अभिमान आहे.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे १९५४ मध्ये काही काळ चापोली येथील भीमाशंकर मल्लिशे यांच्या घरी राहत होते. याच काळात त्यांच्या नेतृत्वाखाली चापोली ते मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधीचे ठिकाण श्रीक्षेत्र कपिलधार या पदयात्रेची सुरवात झाली होती. सुरवातीला त्यांच्या सोबत येथील काही ठराविक भक्त होते. मात्र कालांतराने डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरु केलेल्या या पदयात्रेचे रोपटे आज महाकाय वटवृक्ष बनले आहे. आज ही पदयात्रा फक्त चापोलीपर्यंत मर्यादेत न राहता राज्यातील लातूर, नांदेड, बीड आदी जिल्ह्यातील भाविकभक्तांसह आंध्र प्रदेश व कर्नाटकातील लाखो भक्त या पदयात्रेत सहभागी होत आहेत. या महापदयात्रेत स्त्री-पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव न मानता सर्व भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात.

पदयात्रेचा दिवस म्हणजे चापोली वासियांसाठी मोठा उत्सवच असतो. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महारायांच्या स्वागताला चापोली सजवली जाते. यासाठी महिनाभरापासून पदयात्रेची तयारी येथील भक्त करतात. त्यांच्या रथावर फुलांचा अक्षरशः पाऊस पाडला जातो. हातातील असेल ते कामे सोडून भाविकभक्त त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी येथील कासनाळेे कुटुंबीयांच्या शेतात एकत्र येत असत. आता हे प्रवचन येथील भाविकांच्या कानावर कधीच पडणार नसल्याने भक्तांचे डोळे व मन भरून येत आहे. चापोली येथून निघणारी ही महापदयात्रा पुढे चाकूर, वडवळ, जानवळ, कारेपूर, पानगाव, घाटनांदूर, पुस, नागझरी, अंबाजोगाई, होळ, केज, उमरी, मसाजोग मार्गे श्री क्षेत्र कपिलधार येथे पोहचते. प्रत्येक मुक्कामी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे धार्मिक व प्रबोधनात्मक प्रवचनाचा लाभ भक्तांना मिळत असतो.

कधीही इतरांना दुःख देऊ नये
जीवन जगत असताना मानवाने कधीही इतरांना दुःख देवू नये. समाजात वावरत असताना आपली वाणी गोड असली पाहिजे. आपल्या तोंडून सदैव शिवाचे नामस्मर व्हावे आणि दुसऱ्यांचे मन दुखावेल असे शब्द आपल्या तोंडी येवू नये. आपल्या समोर जर कोणी भुकेला आला तर त्याला अन्नदान करा. तीच खरी ईश्वर सेवा आहे. गतवर्षीच्या प्रवचनातून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी भक्तांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला होता. डॉ. शिवाचार्यांची ही शिकवण कधीच विसरणार नाहीत, अशा प्रतिक्रया भक्त देत आहेत.

(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com