Farmer केले केवळ पाच हजार पंचनामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop damage

जिंतूर तालुक्यात ३३ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer : ३३ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान पण केवळ 5 हजार पंचनामे

जिंतूर : परतीच्या पावसामुळे खरीप पिके हातची गेली. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना नुकसानीची माहिती देऊनही विमा कंपनीने नुकसानीचे पंचनामे केले नाहीत.

तालुक्यातील ३३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन तक्रारी नोंदविल्या आहेत. यापैकी केवळ पाच हजार शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. विमा कंपनीच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने पिकांवर परिणाम झाला. यातच नंतर सलग दहा-बारा दिवस पडलेल्या परतीच्या अति पावसाने तर संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजवला. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन जागेवरच सडत आहे. कपाशीची बोंडे काळी पडली आहेत.

वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती होत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच पिकाचा विमा मिळेल या आशेवर असलेल्या तालुक्यातील ३३ हजार ९६० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने माहिती दिली. परंतु, ऑक्टोबरपर्यंत केवळ पाच हजार २०० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे विमा कंपनीतर्फे पंचनामे करण्यात आले.

सरसकट विमा मंजूर करा

तालुक्यातील एक लाख १३ हजार ७८० शेतकऱ्यांनी विमा भरला. यात ६७ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रातील संरक्षण मिळणार आहे. यासाठी सहा कोटी ९४ लाख शेतकरी हप्ता, राज्य सरकारचे १७ कोटी ५१ लाख आणि केंद्र सरकारचा वाटा १७ कोटी ५१ लाख रुपये असे एकूण ४२ कोटी ९५ लाख रुपये हप्त्यापोटी जमा करण्यात आले.पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सोयाबीन काढायचं कसं हा प्रश्न आहे. उभ्या आणि आडव्या सोयाबीनला कोंब फुटू लागले. पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला. सांगा बळीराजाने जगायचे कसे? राज्यकर्ते ढाल तलवार आणि मशालीतच गुंतून आहेत.

- गोरख आढाव, शेतकरी, बेलखेडा, ता. जिंतूर.