esakal | माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

शेवटच्या दिवसापर्यंत मी भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी लढत होते. तेव्हा तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषित झालेला होता. पण मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली?

माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : भारतीय जनता पक्ष हा माझा पक्ष आहे, माझ्या बापाचा पक्ष आहे आणि मी बंड करीन? माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मी कशाला बंड करू, असा रोकडा सवाल पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून केला. माझ्याविरोधात पुड्या कोण सोडतंय, असं विचारत मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

अनेक दिवसांपासून मी भाजप सोडणार असल्याच्या चर्चा झडत असताना, मी काहीही बोलले नाही. मी कशाला त्यांना स्पष्टीकरणं देऊ, असं म्हणत पंकजा यांनी बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर केलंच, पण पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित हजारो समर्थकांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे, ही मोठी किमया असल्याचं त्या म्हणाल्या. 

फक्त मुंडे स्मारकासाठीच फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री 

ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या जोरदार भाषणानंतर चंद्रकांत पाटील बोलले. त्यापूर्वीही पंकजा यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना गोंधळ न करता चंद्रकांत पाटील यांना बोलू देण्याची सूचना केली. आपल्या भाषणात मात्र, त्यांनी आपल्याविरोधात पुड्या सोडणाऱ्यांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. “शेवटच्या दिवसापर्यंत मी भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी लढत होते. तेव्हा तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही घोषित झालेला होता. पण मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. पराभवासारख्या चिल्लर गोष्टींनी नाराज होणारी मी नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

खडसेंनी अशी केली धो-धो धुलाई

''मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल, तर त्यांनी खुशाल तसा निर्णय घ्यावा. मी मात्र राज्यभर दौरा करून सर्वांची एक वज्रमूठ करणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता लोकांमध्ये काम करणार,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं.

loading image
go to top